पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्यामुळे तुमचं हे नुकसान होतंय.' चिडलेल्या काही ट्रकड्रायव्हर्सनी आजूबाजूच्या गावांत काही ठिकाणी आगी लावल्या. अनेकांनी बैलांच्या शेपट्या कापल्या, डोळे फोडले. गवताच्या गंज्यांना आग लावून त्यांना भाजण्याचे प्रकार घडले. ट्रकवरचे बहुतेक ड्रायव्हर्स हे पंजाबी शीख होते. अशा प्रकारांनी महाराष्ट्र व पंजाब ह्यांच्यात वैमनस्य निर्माण होईल, ह्याचीही तमा कोणी बाळगली नाही.  सुदैवाने एक अगदी अनपेक्षित असे घडले. जेव्हा हे संतापलेले ड्रायव्हर्स प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटले व त्यांच्यात थोडेफार बोलणे झाले तेव्हा ह्या ड्रायव्हर्सना कळले, की हे आंदोलन नेमके कशासाठी आहे. त्यांच्यापैकी बहुतेक सगळे शेतकरी कुटुंबातीलच होते व अनेकांनी तर आपापल्या गावी ऊसही लावलेला होता. शेतीमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी किती हवालदिल झाले आहेत ह्याची त्यांना चांगलीच कल्पना होती. उसाला तीनशे रुपये भाव मागणे हे अगदी योग्यच आहे असे त्यांचेही मत होतेच. त्यामुळे ह्या रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांविषयी पंजाबी ट्रक ड्रायव्हर्सना शेवटी सहानुभूतीच वाटू लागली!  एक उंचेपुरे ट्रक ड्रायव्हर त्यातल्या त्यात सुशिक्षित व नेत्यांमध्ये गणना होईल असे दिसत होते. त्यांचे नाव सरदार जगजितसिंग. पंजाबातील किसान संघटनेचे ते पूर्वी सेक्रेटरीही होते. अन्य ड्रायव्हर्सना समजावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दहिवेल येथील शाळेच्या पटांगणात ट्रक ड्रायव्हर्स व शेतकरी यांची एक संयुक्त सभाही आयोजित केली गेली व त्या सभेत जोशींनी हिंदीतून भाषणही केले. ड्रायव्हर्सच्या वतीने जगजितसिंग यांनी समारोप केला. ते म्हणाले,  "खतं, बियाणं, डिझेल, औषधं यांच्या अफाट किमतींनी आम्हीही अगदी हैराण झालो आहोत. आम्हालाही शेतीत काहीच सुटत नाही. तुमचं दुखणं आणि आमचं दुखणं एकच आहे. तुम्ही पंजाबातदेखील या आणि उसाप्रमाणे गव्हाच्या किमतीसाठीदेखील असंच आंदोलन आपण एकत्र लढवू या."  पुढे शेतकरी संघटना पंजाबात गेलीदेखील, पण त्यापूर्वीच ह्या ड्रायव्हर्सनी शरद जोशींचे विचार आपापल्या मुलखात पोचवले होते. हा या आंदोलनाचा अगदी अनपेक्षित असा मोठा फायदा.

 रास्ता रोकोच्या जोडीनेच रेल रोकोही सुरू झाले होते. नाशिक ते मनमाड हा रेल्वे मार्ग सर्वांत आधी बंद पडला. नाशिक रोड स्टेशनवर नागपूर एक्स्प्रेस आठ तास अडकून पडली होती; इतरही अनेक गाड्या अशाच रखडल्या होत्या. अडकलेल्या प्रवाशांना शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी व दूध आवर्जून पुरवले. खरेतर रेल्वे अधिकाऱ्यांना ह्या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती, पण ते बेपर्वा राहिले. ज्या आंदोलनामागे एकही राजकीय नेता नाही, त्या आंदोलनाला इतका प्रतिसाद मिळेल असे मुळात कुठल्याच सरकारी अधिकाऱ्यांना वाटले नव्हते.

उसाचे रणकंदन १५५