पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागोजागी सहकारी साखर कारखाने उभे राहू लागले. बघता बघता त्यांची संख्या दोनशेवर पोचली.
 हे कारखाने तत्त्वशः सहकारी मालकीचे असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पुढाऱ्यांचीच सत्ता तिथे चालत होती. साखर कारखान्याच्या जोडीने दूधसंघ, सूत गिरण्या, सहकारी बँका, पतपेढ्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या व पुढे पुढे शिक्षणसंस्थाही उभ्या राहिल्या. प्रत्येक सहकारी साखर कारखाना म्हणजे त्या परिसरातील सर्वांत मोठे सत्ताकेंद्रही बनले. कमिशन घेऊन मजूर पुरवायची वा वाहतुकीची कंत्राटे देणे, मालमत्ता खरेदी करणे वा विकणे, आपल्या मर्जीतल्या व्यक्तींना रोजगार देणे अशा अनेक मार्गांतून प्रचंड पैसा हाती येऊ लागला व सत्ताकेंद्राप्रमाणे हे कारखाने आर्थिक केंद्रेही बनली. ह्याच वर्गाकडे राज्याचे राजकीय नेतृत्वही होते. शासनाचा बराचसा विकासनिधीही ह्यांच्यामार्फतच वापरला जाई. ग्रामीण राजकारणावर, अर्थकारणावर आणि समाजकारणावर या सहकारी साखर कारखान्यांची इतकी पकड का होती व प्रत्येक राजकीय नेत्याला स्वतःच्या नियंत्रणाखाली एखादा साखर कारखानातरी असावा असे का वाटत होते, व आजही का वाटते, हे यावरून स्पष्ट होते.
 नेमक्या याच सत्ताकेंद्राला शेतकरी संघटनेने आव्हान दिले होते. तेही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आंदोलनातूनच. जो शेतकरी वर्ग सत्ताधाऱ्यांचा पारंपरिक आधार होता, तो आता जोशींकडे वळ लागला होता. सत्ताधाऱ्यांनी इतकी वर्षे शेतकऱ्यांना कशा प्रकारे लटले हे शेतकरी संघटनेच्या सतत होणाऱ्या सभांमधून शेतकऱ्यांपुढे येत होते, अगदी त्यांना सहज समजेल अशा भाषेत येत होते. त्यांच्या असंतोषाचा आज जो स्फोट होत होता त्यामागे हीच आपल्यावर वर्षानुवर्षे होत गेलेल्या अन्यायाची काळीजभेदी जाणीव होती. म्हणूनच सत्ताधारी राजकारणी जोशींच्या इतक्या विरोधात होते.

 निफाडपाठोपाठ इतरही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तीनशेपेक्षा कमी भावात कारखान्यांना ऊस द्यायचा नाही असा निर्धार केला. ११ सप्टेंबर १९८० रोजी पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांचा एक मोठा निर्धार मेळावा भरला होता. आजवरचा सर्वांत मोठा. पन्नास हजार शेतकरी ह्या मेळाव्याला हजर होते. शेतकऱ्यांचा हा भव्य प्रतिसाद खुद्द त्रिमूर्तीलाही थक्क करणारा होता. १० नोव्हेंबरपर्यंत जर शासनाने उसाला ३०० रुपये भाव मंजूर केला नाही, तर शेतकरी रास्ता रोको करतील व रेल रोकोदेखील करतील असे जाहीर करण्यात आले.

 मोरे यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. 'या बामनाचं काय ऐकता! त्याला काय कळतं शेतीतलं?' अशी टीका जोशींवर खूपदा होत असे. जोशींच्या ब्राह्मण्याचा कुचेष्टेने उल्लेख केला जाई. त्यांचे ब्राह्मण्य अधोरेखित करून शेतकऱ्यांना त्यांच्यापासून तोडायचा हा डाव होता. त्याचा संदर्भ देत मोरे म्हणाले,

 "आम्हाला असं बनवायचे दिवस आता गेले! हे जोशी बामण आहेत आणि ह्या बामणाचं काय ऐकता, असलं काही आता आम्हाला शिकवू नका. हे असलं ऐकून घेण्याइतके आता

१५०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा