पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कराड पाटील प्रांजळपणे म्हणाले,
 "आमच्या ह्या बाह्य रूपावर जाऊ नका. हे सारं फसवं आहे. सगळे कर्जात डुबलेले आहेत. आम्हा शेतकऱ्याचं धोतर एका बँकेचं असतं, सदरा दुसऱ्या बँकेचा असतो, तर टोपी तिसऱ्या बँकेची असते!"
 हे त्यांचे उद्गार जोशींच्या स्मरणात कोरले गेले होते व पुढे अनेक ठिकाणी त्यांनी ते उद्धृत केले.
  पुढील काही दिवस ह्या त्रिमूर्तीने केवळ निफाड तालुका नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हा पालथा घातला. धुळे आणि नगर जिल्ह्यांतही सभा घेतल्या. आंदोलनाचे लोण गावागावातून पोचवले. एकेका दिवसात आठ-आठ, दहा-दहा सभा होत. याच दरम्यान बागलाणचे एक शेतकरी रामचंद्रबापू पाटील त्यांना येऊन मिळाले. इतरही साथी मिळत गेले. मुख्य म्हणजे निफाड साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरास्ते हेदेखील त्यांच्या बाजूने उभे राहिले. खरे तर त्यांनी सुरुवातीला संघटनेला खूप विरोध केला होता, जोशींना निफाडमध्ये आणल्याबद्दल निरगुडेंना बराच दमदेखील भरला होता. पण पुढे मोरे यांनी त्यांचे मन वळवले; १५ एप्रिल रोजी जोशी यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीचाही बराच परिणाम झाला. जोशींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऊस पिकवण्याचा व पुढे कारखान्यात त्याची साखर बनेस्तोवरचा सगळा खर्च काळजीपूर्वक काढला व जोशी यांची मागणी अगदी न्याय्य आहे ह्याविषयी त्यांची खात्री पटली. त्यांच्याच पाठबळाने भरलेली निफाडची १५ ऑगस्ट १९८०ची सभा महत्त्वाची ठरली.
  'शंभरखाली कांदा नाही, तीनशेखाली ऊस नाही' ह्या घोषणेने सभेची सांगता झाली. कांद्याला दुसऱ्या एका शेतीमालाची इथे प्रथमच जोड मिळाली.
 माधवराव बोरास्ते यांनीही जाहीररीत्या या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला. ती मान्य होईस्तोवर निफाड तालुक्यातील शेतकरी येत्या गळीत हंगामात साखर कारखान्यात ऊस देणार नाहीत असेही त्यांनी जाहीर केले व लगोलग ९ ऑक्टोबर १९८० रोजी भरलेल्या आपल्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ५,५०० भागधारक शेतकऱ्यांसमोर तसा ठराव मांडला, त्याच्या समर्थनार्थ स्वतः मोठे भाषण केले व तो ठराव एकमताने संमतही झाला.

 साखर कारखान्याने स्वतः असा ठराव करणे ही एक ऐतिहासिक घटना होती. बोरास्ते यांचा पुढाकार साखर कारखानदारांच्या वर्तळात मोठीच खळबळ माजवणारा होता. कारण महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे बोरास्ते अध्यक्ष होते. या धाडसाबद्दल बोरास्ते यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल, कारण ते करताना त्यांनी केवळ आपली व्यक्तिगत प्रतिष्ठाच नव्हे, तर सहकारक्षेत्रातील सारे भविष्यच पणाला लावले होते. सहकारक्षेत्र हा महाराष्ट्रातील काँग्रेसनेत्यांचा बालेकिल्ला होता व त्या सर्व नेत्यांचा रोष आता बोरास्तेंनी ओढवून घेतला होता. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली; प्रचंड मानसिक तणावाला तोंड द्यावे लागले. पुढे त्यांचे अकालीच ओढवलेले मरण हा ऊस आंदोलकांना मिळालेला मोठाच धक्का होता. तीनशे रुपये भावाची मागणी न्याय्य आहे व तो भाव

१४८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा