पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेला. हे जवान खरेतर दुसऱ्याच कुठल्यातरी मोहिमेवर चालले होते, पण त्यांना अचानक मुंबई-आग्रा महामार्गावर पाठवले गेले. त्यांनी शिरवाडे (कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचे गाव) येथे रस्ता रोखून धरलेल्या शेतकऱ्यांवर जबरदस्त लाठीमार केला. एवढेच नव्हे तर दुपारी पावणेदोन वाजता गोळीबारदेखील केला. दोन शेतकरी ठार झाले. माधवराव मोरे यांच्यासह आठ आंदोलक जबर जखमी झाले. शेतकरी संघटनेने ह्या घटनेचा तीव्र निषेध केला व जोशी स्वतः तातडीने पिंपळगाव येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले.

 ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद जोशी यांचे निफाडमध्ये आगमन झाले. १५ एप्रिल १९८० रोजी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या के. के. वाघ विद्याभवनात दुपारी दोन वाजता जोशी यांची सभा आयोजित करण्यात आली. ह्या सभेत जोशींनी दीड तास भाषण केले. नाशिक जिल्ह्यातील त्यांची ही पहिली सभा. एका अर्थाने शेतकरी संघटनेचे हे नाशिक जिल्ह्यातील बीजारोपण म्हणता येईल.

 त्यानंतर झालेल्या चर्चेत १५ ऑगस्ट रोजी निफाडला मोठी सभा घ्यायचे ठरले. त्यासाठी जोशी आणि मोरे यांची एकत्र भेट घडवन आणायचे निरगडेंनी ठरवले व १२ ऑगस्टला तशी भेट घडवूनही आणली. "माधवराव, ह्या मुलांनी उद्या तुमच्या तालुक्यात माझा दौरा आखला आहे. तुम्हीही आमच्याबरोबर यावं अशी माझी इच्छा आहे," भेटीत जोशी म्हणाले. मोरे यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. ते म्हणाले, “साहेब! तुम्ही आमच्या तालुक्यात येऊन आम्हालाच कार्यक्रमाला यायचं आमंत्रण देता? हे पाहा, उद्यापासून मी तुमच्या गाडीचा ड्रायव्हर. आपण हुकूम करायचा."

 यापूर्वी या दोघांनी एकमेकांविषयी ऐकले होते, वाचले होते, मात्र प्रत्यक्ष भेट प्रथमच होत होती. पण अवघ्या दहा मिनिटांच्या चर्चेतच दोघांची मने जुळली. कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रल्हाद कराड पाटील हेही लौकरच त्यांना येऊन मिळाले. यावेळच्या आंदोलनातच नव्हे तर त्यानंतरही शेतकरी संघटनेच्या वाटचालीत ही त्रिमूर्ती अनेक वर्षे अग्रस्थानी राहिली.

 चाकण आंदोलनात जोशी यांना शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी यांच्यासारखे जे जिवाभावाचे सहकारी लाभले, त्यांच्यापेक्षा हे दोन सहकारी अनेकदृष्ट्या वेगळे होते. दोघेही आपापल्या परीने समाजात नामांकित होते. दोघांचीही स्वतःची मोठी शेती होती. दोघांमध्येही स्वतःचे असे नेतृत्वगुण आंदोलनात येण्यापूर्वीही होते. दोघांनीही जोशी ह्यांचे प्रथम स्थान निर्विवादपणे मान्य केले होते यात शंका नाही, पण त्यांच्यापासूनही जोशी यांना काही ना काही शिकायला मिळत होते. उदाहरणार्थ, उसाची शेती बरीच फायदेशीर असते असे जोशींना वाटायचे, ते खूप चुकीचे होते हे या दोघांनी दाखवून दिले. ऊसशेतीतल्या अडचणी, खतांच्या आणि औषधांच्या भडकलेल्या किमती, कारखान्यांमधील भ्रष्टाचाराच्या नाना तहा, साखरनिर्मितीच्या प्रत्येक पावलावर असलेले सरकारचे व पर्यायाने राजकारण्यांचे जाचक नियंत्रण वगैरे अनेक गोष्टी या दोघांमुळे जोशींच्या लक्षात आल्या.

 असे असूनही ऊस शेतकरी रुबाबात कसे काय राहू शकतात, ह्याचे उत्तर देताना प्रल्हाद

उसाचे रणकंदन १४७