पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समता मंचाच्या कार्यकर्त्यांनी गाण्याचा रसाळ कार्यक्रम सादर केला व तो सर्वांचीच दाद मिळवून गेला.

 दुसऱ्या दिवशी विषय होता – सरकारी कामाचा शेतकऱ्यांना येणारा अनुभव. सर्वांचा बोलण्याचा सूर एकच होता - सरकारी कामात भ्रष्टाचार फार आणि कार्यक्षमता शून्य. अपेक्षेप्रमाणे ह्या चर्चेत बऱ्याचशा शिबिरार्थीनी आपले अनुभव सांगितले. शेतकऱ्यांच्या साचलेल्या कर्जाविषयीही ह्या सत्रात सखोल चर्चा झाली.

 जेवणानंतरच्या सत्रात ख्यातकीर्त अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांनी 'शेतीमालाचे भाव' ह्या विषयावर भाषण केले. शेतीमालाची मागणी व त्याचा पुरवठा ह्यांत सुसूत्रता आणणे आणि पक्क्या मालाची मागणी व त्याचा पुरवठा ह्यांतही सुसूत्रता आणणे कसे गरजेचे आहे ह्यावर ते बोलले. संघटित कामगारवर्ग व शेतकरी यांच्यात एकजूट निर्माण करायची असेल, तर त्यासाठी संघटित कामगारांनी आपली स्वार्थी वृत्ती कमी केली पाहिजे असे ते म्हणाले.

 शेवटचे सत्र १९८०-८१ साली संघटनेचा कार्यक्रम काय असावा ह्यावर होते. काही महत्त्वाच्या शेतमालाचे किमान भाव ठरवून मागावेत हा मुख्य कार्यक्रम ठरला. पण त्याखेरीज दारिद्र्य हटवण्यासाठी गावातील दारूवरील खर्च तसेच वेगवेगळे उरूस-सण ह्यांवरील खर्च ह्यांनाही आळा घालायची गरज अनेकांनी व्यक्त केली. शिबिराच्या शेवटी आळंदीच्या ग्रामस्थांची एक सभा झाली व त्यात ग्रामस्थांना संघटनेच्या कार्याची माहिती दिली गेली.

 शिबिराला एकूण शंभरावर शेतकरी हजर होते. आळंदी येथील डबेवाला धर्मशाळा येथे सर्वांची राहायची-जेवायची व सभांची व्यवस्था केली होती. चाकणच्या काही प्रथमपासूनच्या सहकाऱ्यांनी शिबिराची सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.

 संघटनेच्या भावी शिबिरांसाठी दैनंदिन कार्यक्रमाचा व एकूण व्यवस्थापनाचा एक ढाचा ह्या शिबिराने घालून दिला.

 पाच धरणांचे पाणी मिळणारा नाशिक जिल्ह्यातील निफाड हा खुप सुपीक तालुका. पिंपळगाव बसवंत ही येथील एक प्रमुख बाजारपेठ. ऊस व कांदा ह्यांचे इथे उत्तम पीक येई. देशात जेव्हा कृषी संशोधन केंद्रे स्थापन करायला सरकारने सुरुवात केली, तेव्हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यात इथे एक केंद्र स्थापन झाले होते. चाकण आंदोलनाचे पडसाद इथेही उमटले होतेच. फेब्रुवारी १९८०मध्ये कांद्याच्या भावाची घसरगुंडी सुरू झाली व ती थांबण्याचे काहीही चिन्ह दिसेना. त्यामुळे शेतकरी खूप चिडलेले होते. ज्या गाड्या व ट्रेलर्समधून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा आणला होता, त्या त्यांनी रस्त्यावर वेड्यावाकड्या सोडून दिल्या व मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला. ही घटना १९ मार्च १९८०ची. त्यावेळी जोशींचे ह्या भागात आगमन झाले नव्हते; आंदोलनाचे नेतृत्व पिंपळगाव येथील माधवराव खंडेराव मोरे करत होते.

 महामार्ग मोकळा करण्यासाठी आंदोलकांशी कोणताही विचारविनिमय न करता शासनाने कडक कारवाई करायचे ठरवले. वायरलेसवरून एसआरपीच्या एका गटाला तातडीचा हुकूम

१४६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा