पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सकाळी ते पत्र टपाल पेटीत टाकले. आश्चर्य म्हणजे लगोलगच उत्तरही आले! 'प्रत्यक्ष येऊन भेटावे व चर्चा करावी.'

 दुसऱ्याच दिवशी निरगुडे बरोबर भाकऱ्या बांधून नाशिकला गेले व पुण्याच्या एसटीत बसले. 'भेट वादळाशी' ह्या शीर्षकाखालील एका लेखात त्यांनी ह्या पहिल्या भेटीचे रसाळ वर्णन केले आहे. (मा. शरद जोशी अमृतमहोत्सव स्मरणिका, २००९, पृष्ठ १२५)

 कारखाना व घर हा परिसर सोडून त्यापूर्वी निरगुडे कुठेच गेले नव्हते; अगदी चाकणलाही नाही. बस कंडक्टरला 'चाकण आले की मला नक्की सांगा' असे सांगून, बस तिथे पोचल्यावरही दोन-चार जणांना विचारून खात्री करून घेत ते उतरले आणि बरीच विचारपूस करत कसेबसे संघटनेच्या कार्यालयात पोचले. आत बाबूलाल परदेशी एकटेच होते. त्यांचे जोशींबरोबर पूर्वीच बोलणे झाले असावे. थोड्याच वेळात जोशी आले. त्यांना पाहताच निरगुडे गांगरले, पण जोशींनी हसतमुखाने त्यांच्याशी बोलून त्यांना आश्वस्त केले. 'चला माझ्याबरोबर,' जरा वेळाने जोशी म्हणाले. कुठे, कशाला काही नाही.

 लगेच निरगुडे उठले. बरोबर बांधून आणलेली भाकऱ्यांची पुरचुंडीदेखील घाईघाईत ते बसलेल्या बाकड्याखालीच विसरले! जोशींनी झटक्यासरशी आपली बुलेट सुरू केली. निरगुडे मागे बसले. त्या काळात जोशी खूप वेगात गाडी हाकत. बघताबघता गाडी हायवेला लागली. निरगुडे लिहितात, "माझ्या आयुष्यात इतक्या वेगाने मोटार सायकल चालवणारा अद्यापतरी कोणी भेटलेला नाही.”

 दोघे सरळ पुण्याला जोशींच्या औंधमधील घरी गेले. गप्पा सुरू झाल्या. आपल्या आंदोलनात ह्या पोरसवदा तरुणाचा उपयोग होऊ शकेल, ह्याच्यात काहीतरी वेगळी चमक आहे, हे जोशींना बहुधा जाणवले होते. किंबहुना म्हणूनच त्यांनी तत्परतेने पत्रोत्तर पाठवून निरगुडेंना बोलवून घेतले होते. त्या दृष्टीने त्यांची जुळणी सुरू होती. ते नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची नेमकी माहिती काढू पाहत होते. निरगुडे त्या रात्री जोशी परिवाराबरोबरच जेवले व राहिलेही. ते लिहितात,

सर्व कुटुंबासह आणि डायनिंग टेबलावर असा मी आयुष्यात प्रथमच जेवत होतो. आग्रह होत होता. मी नको नको म्हणत कसबसा घाबरतच जेवत होतो...त्या रात्री झोप येणं शक्य नव्हतं. मनात विचार चालू होते. ही मोठी माणसं, त्यांच्या सहवासात आपण चुकून आलो. त्यांचं जग वेगळं, आपलं वेगळं. उद्या सकाळी उठून चहा न घेताच इथून एकदाचं पलायन करायचं.

 पण प्रत्यक्षात पुढले तीन दिवस जोशींनी त्यांना स्वतःबरोबरच आपल्या प्रवासात सतत ठेवून घेतले. संघटनेच्या आळंदी येथील सभेला निरगुडे त्यांच्याबरोबरच हजर राहिले. किंबहुना त्यांनी स्टेजवर बसावे असा जोशी यांचा आग्रह होता; पण संकोचाने निरगुडेंनी तो मानला नाही. जोशी यांच्या तेथील भाषणाविषयी निरगुडे लिहितात,

उसाचे रणकंदन १४३