पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


उसाचे रणकंदन


 “Journey of a thousand miles begins with the first step” (हजार मैलांच्या प्रवासाची सरुवात एका पहिल्या पावलाने होते) हे रशियन क्रांतिकारक लेनिनचे उद्गार प्रसिद्ध आहेत. चाकण येथील कांदा आंदोलन हेदेखील एक मोठ्या प्रवासाचे केवळ पहिले पाऊल आहे ह्याची शरद जोशी यांना हळूहळू जाणीव होत गेली. कारण सगळ्याच शेतकऱ्यांची दुःखे इथूनतिथून सारखीच आहेत हे उघड होत गेले.

 ठिकठिकाणचे शेतकरी 'वारकरी'कडे पाठवत असलेल्या पत्रांवरूनदेखील ही गोष्ट अगदी स्पष्ट होत होती. वेळात वेळ काढून जोशी त्यांतील निवडक पत्रांना उत्तरेही लिहीत असत. त्यासाठी रात्रीची झोप त्यांनी शक्य तितकी कमी केली होती. कारण पत्रव्यवहार सांभाळायला त्यांच्याकडे दुसरा कोणी कर्मचारी नव्हता. कार्यकर्ते होते, पण ते तसे लिखापढी करणारे नव्हते. सगळी पत्रे जोशी स्वतःच लिहीत व तीही हाताने. पण त्यात ते कधी कंटाळा करत नसत, कारण ह्या साध्या साध्या पत्रांतूनच अंगारमळ्यातील अंगार इतर ठिकाणीही जाऊन पोचणार होता याची त्यांना खात्री होती. असेच एक पत्र त्यांनी एका सकाळी पत्रपेटीत टाकले. ते होते, निफाडचे एक तरुण तुकाराम निरगुडे पाटील यांना. त्यांच्या त्याच दिवशी आलेल्या एका पत्राचे उत्तर म्हणून. त्या पत्रामागची उत्कटता कुठेतरी जोशी यांना स्पर्शून गेली होती.

 चाकण परिसरातील कांद्याइतकाच शेजारीच असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत बाजारपेठेतला कांदाही खूप प्रसिद्ध होता. तेथील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवत आणि साहजिकच चाकणच्या आंदोलनाकडे तेही डोळे लावून बसले होते. त्यांच्यापैकीच एक होते निरगुडे. निफाड सहकारी साखर कारखान्यात ते कारकुनी करत. शेतीवाडी गावाला होती. राहायला कारखान्याच्या कॉलनीतच जागा होती. संध्याकाळी खोलीवर आल्यावर मिळतील तेवढे सगळे रोजचे पेपर वाचायचा त्यांचा प्रघात होता. असेच एका संध्याकाळी त्यांनी चाकणच्या कांदा आंदोलनाबद्दलचा एक सविस्तर वृत्तान्त वाचला. वाचून ते अगदी भारावून गेले. 'कसेही करून ह्या शरद जोशींना भेटले पाहिजे, त्यांच्या मनाने घेतले. पण भेटणार कसे? ओळखपाळख काहीच नव्हती.

पण भेटायचा विचार पिच्छा सोडेना. झोपही येईना. शेवटी न राहवून रात्री बारानंतर ते उठले. कोणाकडून तरी आंतर्देशीय मिळवून त्यांनी एक पत्र लिहिले – 'मी तुम्हाला भेटायला येऊ इच्छितो.' अंदाजानेच शरद जोशी, शेतकरी संघटना, चाकण' असा पत्ता लिहिला आणि

१४२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा