पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपरोक्त सहकाऱ्यांप्रमाणे जागोजागी विखुरलेल्या त्यांच्या इतरही सहकाऱ्यांचे हार्दिक सहकार्य मिळाले. अनेकांनी त्यानंतर माझ्याशी संपर्क साधला व स्वतःजवळची शक्य ती माहिती पुरवली.
 ह्या चरित्रासाठी जोशींनी खूप वेळदेखील दिला. यापूर्वीच्या धावपळीच्या आयुष्यात ते जमले असते असे वाटत नाही. त्या काळात शेतकरी लढ्यांमध्ये जोशींचा प्रत्यक्ष सहभाग असा फारसा राहिला नव्हता; महत्त्वाच्या सभांना ते हजर राहत, आपले विचार मांडत, मार्गदर्शन करत, एवढेच. बहुधा त्यामुळेच ते चरित्रासाठी पुरेसा वेळ देऊ शकले, न कंटाळता निवांतपणे जुन्या आठवणी सांगू शकले, शक्य तेव्हा मी बरोबर प्रवासात यावे अशी व्यवस्था करू शकले. तसे करताना शेतकरी चळवळीच्या बाहेरचा एक माणूस म्हणून मला खूपदा अवघडल्यासारखे वाटे, कारण आमच्यातील तशा प्रकारच्या जवळीकीमुळे त्यांच्या जुन्या निष्ठावान सहकाऱ्यांना काय वाटू शकेल असा विचार मनात यायचा; पण जोशींचे आमंत्रण आग्रहाचे असे.
 दर शुक्रवारी सकाळी दहा वाजता आम्ही भेटायचो. दोन-तीन तास बोलणे व्हायचे. प्रत्यक्षात काम खूपच लांबत गेले. एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे फारशी काही मूळ कागदपत्रे नव्हती आणि पूर्ण शहानिशा करून घेतल्याशिवाय कुठलाही मजकूर मला चरित्रात घ्यायचा नव्हता. 'एकदा उद्वेगाच्या भरात त्यांनी त्यांचे बरेचसे व्यक्तिगत कागदपत्र नष्ट केले,' असे नंतर मला म्हात्रेनी सांगितले. अशा परिस्थितीत चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत आणि निपाणीपासून चंडीगढपर्यंत विखुरलेल्या त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी माझे आपल्या घरात आणि भावविश्वात स्वागत केले, आपला किमती वेळ दिला, आपल्याजवळचे कागदपत्र दिले, कडूगोड आठवणी सांगितल्या व या साऱ्या अमूल्य सहकार्यामुळेच पूर्वी कधीच लोकांसमोर न आलेली बरीच माहिती उजेडात आली आणि एकूणच ह्या लेखनाला स्मरणरंजनाच्या पलीकडे जाणाऱ्या दस्तावेजाचे स्वरूप देता आले.

 हे चरित्र लिहिताना ज्यांच्याकडून वेगवेगळी माहिती उपलब्ध झाली, त्यांचा उल्लेख शक्यतो प्रत्यक्ष लेखनात त्या-त्या जागी केलेला आहे; वेगवेगळ्या उद्धृतांचे मूळ स्रोतही नोंदवलेले आहेत. वारकरी, आठवड्याचा ग्यानबा आणि शेतकरी संघटक या अधिकृत मुखपत्रांचे जुने अंक आणि शरद जोशींचे पूर्वप्रकाशित साहित्य हा अर्थातच एक महत्त्वाचा स्रोत होता. पुस्तकात वापरलेली अनेक छायाचित्रे सरोजा परुळकर यांनी पुरवली व स्वतंत्र श्रेय नोंदवलेले नाही ती छायाचित्रे सुरेशचंद्र म्हात्रे यांच्या सौजन्याने प्राप्त झाली. त्यांचे आभार मानतो. जेव्हा जेव्हा मी जोशींना भेटायला त्यांच्याकडे जात असे, तेव्हा तेव्हा ज्यांनी माझा कधीही न कंटाळता मनापासून पाहुणचार केला, त्या दर्शिनी भट्टजी ऊर्फ दीदी यांचे आभार मानतो. सुरेशचंद्र म्हात्रे यांचे सहकार्य तर अगदी शब्दातीत आहे. गेल्या पाच वर्षांत असा एकही आठवडा गेला नसेल, जेव्हा मी काही ना काही माहितीसाठी त्यांना फोन केला नाही वा भेटलो नाही. सर्व लेखन पूर्ण झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने म्हणून त्यांनीच प्रत्येक पान नीट तपासून दिले ह्याबद्दलही त्यांचे आभार मानायला हवेत.

अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ◼ १५