पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैसे देऊन खरेदी करावा लागेल, आंदोलनाचे पडसाद देशभर उमटतील; इतरही शेतकरी असेच आंदोलन उभारू शकतील आणि कांद्याचा लढा ही देशभरातील शेतकरी क्रांतीची सुरुवात ठरू शकेल.

 व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर, आपला शेतीमालाला रास्त दाम' हा एक-कलमी कार्यक्रम शतकानुशतके विस्कळित राहिलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या शेतकरी समाजाला एकत्र आणू शकतो, त्यांनाही आंदोलनासाठी उभे करू शकतो ह्याचा आत्मविश्वासदेखील जोशींना या कांदा आंदोलनाने दिला. शेतकरी संघटनेचे हे पहिलेच आंदोलन. संघटनेचे सामर्थ्य या आंदोलनात सिद्ध झाले.

 ह्या आंदोलनात प्रथमच जोशी यांनी रास्ता रोको किंवा उपोषण ह्यांसारखी हत्यारे वापरली. अशा प्रकारचे आंदोलन हा त्यांच्यासारख्या एकेकाळच्या वरिष्ठ सनदी नोकराचा पिंडच नव्हता. शिवाय ते एक अभ्यासकही होते व अशा प्रकारचे आंदोलन हा एखाद्या अभ्यासकाचाही पिंड नव्हे. जोशी यांच्या पूर्वायुष्याकडे पाहता असे काही त्यांच्या भावी आयुष्यात घडू शकेल ह्याचा अदमास कुणीच बांधू शकले नसते, इतके हे आंदोलन त्यांच्या व्यक्तित्वाशी विसंगत होते. 'शेतकरी संघटना हा माझ्या आयुष्यातील एक अपघात आहे,' असे स्वतः जोशी पुढे अनेकदा म्हणाले.

 पण हे घडून आले खरे. त्यांच्यासारखा एक गंभीर विचारवंत एक कडवा आंदोलक बनला तो ह्याच काळात. त्यांच्या भावी कार्याची ही नांदी होती. याच पहिल्या ठिणगीतून बघता बघता एक वणवा भडकणार होता.

 स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तर इतके यशस्वी शेतकरी आंदोलन दुसरे कुठले झाल्याचे दिसत नाही. कांदा आंदोलनाचे हे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.


चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१४१