पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी, आमची गाडी, आमचे दोन बैल, आणि आमचा डॅश कुत्रा ह्या रस्त्यावर बसू आणि आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालवू.'

 लीलाताई जेव्हा आंदोलनस्थळी आल्या व त्यांनी भाषण करावे अशी काही जणांनी त्यांना विनंती केली, तेव्हा त्या मंडळांची अपेक्षा अशी होती, की त्या साहेबांचा जीव वाचावा म्हणून, तात्पुरती का होईना पण, आंदोलनाला स्थगिती देतील आणि मग आपला कांदा आपण येईल त्या भावाला नेहमीप्रमाणे विकून मोकळे होऊ. पुढचे पुढे. प्रत्यक्षात उलटेच काहीतरी घडले. समोर शेकडो शेतकरी स्त्रियाही उपस्थित होत्या व लीलाताईंच्या भाषणाने त्या अगदी पेटून उठल्या. त्यांतील एक उत्स्फूर्तपणे उभी राहिली व म्हणाली,

 "माझं कुंकू पुसलं गेलं तरी हरकत नाही, पण आता मी माघार घेणार नाही, असं आत्ता साहेबांच्या बाई म्हणाल्या. त्या जर एवढ्या मोठ्या त्यागाला तयार असतील, तर मग मीही आता मागे हटणार नाही. बाकी पुरुष शेतकरी भले पळून जावोत, आम्ही शेतकऱ्यांच्या बाया आता हे रास्ता रोको चालूच ठेवू. ही लढाई आम्ही लढतच राहू. आमचं जे काय व्हायचं असेल ते होऊन जाऊ दे."

 बायकांनी घेतलेला हा अनपेक्षित पुढाकार पाहून मग सगळेच शेतकरी पुन्हा एकदा रास्ता रोको करायला पुढे झाले. सगळेच वातावरण एकदम बदलून गेले. त्वेषाने जोरजोरात घोषणा सरू झाल्या. नाफेडच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांनी बाजार समितीतल्या त्यांच्या कार्यालयातच कोंडले. आंदोलनाची तीव्रता एकदम वाढली. सरकारी अधिकारी व हजर असलेले पोलीसही गांगरून गेले. शेतकऱ्यांच्या निर्धारापुढे मग सरकारी यंत्रणेला झुकावे लागले.

 लीलाताईंचे ते वीरश्रीपूर्ण भाषण म्हणजे कांदा आंदोलनातील एक नाट्यपूर्ण व निर्णायक क्षण होता. शिवकाळात कोंढाणा किल्ला सर करताना शेलारमामाने जी भूमिका बजावली होती व आपल्या पळून जाणाऱ्या मावळ्यांना चेतवून पुन्हा एकदा लढाईसाठी सज्ज केले होते, तशीच काहीशी भूमिका ह्या वेळी लीलाताईंनी बजावली होती. मामा शिंदे व त्या रोमांचक क्षणाचे साक्षीदार असलेले त्यावेळचे चाकणमधील इतरही काही कार्यकर्ते आजही ही आठवण पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.

 शेवटी नाफेडचे पाटील नावाचे एक अधिकारी चाकणला आले व त्यांनी वाटाघाटी करून क्विटलला ५० ते ६० रुपये हा भाव मान्य केला. हा विजय मोठा होता; कारण त्या वेळी कांद्याचा भाव १५ रुपये क्विटलपर्यंत कोसळला होता. त्यामुळे मग ६ मे रोजी, सहाव्या दिवशी, जोशींनी आपले हे दुसरे उपोषण सोडले.

 निर्यातबंदी घालणे व आंदोलन तीव्र झाले तर ती तेवढ्यापुरती उठवणे हे एक दुष्टचक्रच सुरू झाले होते. ह्याचीच पुनरावृत्ती पंधरा दिवसांनी झाली. २८ मे १९८० रोजी खेड तालुक्यातील विधानसभेची निवडणूक होणार होती. सगळीकडे धामधुमीचे वातावरण होते. पण त्याचवेळी चाकणच्या बाजारपेठेत मात्र शेतकरी खूप काळजीत होते. ह्यावेळी नाफेडने वरकरणी खरेदी चाल ठेवली होती, पण प्रत्यक्षात ते कांदा खरेदी करत नव्हते; काही ना काही

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१३७