पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले! विशेष म्हणजे त्यात १,००० महिलादेखील होत्या. तसे पाहिले तर कांदा शेतकरी ह्या मोर्ध्यात थोडे होते; मुख्यतः भातशेती करणारे व आदिवासी जास्त होते. बहुधा त्यांनाच रस्ता नीट नसल्याची सर्वाधिक झळ पोचत होती. पण एकूण प्रतिसाद थक्क करणारा होता.

 पुढे सरकारने हे काम हाती घेतले व संघटनेनेहा साराबंदा तहकूब केली. शासनाच्या नेहमीच्या कूर्मगतीने केव्हातरी काम पूर्णही झाले. अर्थात आज इतक्या वर्षांनीसुद्धा चाकणवांद्रे ह्या रस्त्याचा दर्जा अगदीच सुमार आहे.

 रूढ अर्थाने विधायक कार्य म्हणता येईल असे जोशींचे हे शेवटचेच काम ठरले. एकूणच प्रचलित स्वरूपाच्या ग्रामविकासाच्या कार्याविषयी त्यांचे मत खूप प्रतिकूल बनत गेले होते. यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलन हाच आपला एक-कलमी कार्यक्रम ठरवला व आयुष्यभर तो निर्णय कायम ठेवला.

 जानेवारी १९८०पासून निर्यातबंदीमुळे पुन्हा एकदा भाव घसरू लागले. कांद्याला त्याच्या दाप्रमाणे क्विटलमागे रुपये ५० ते ७० असा किमान भाव मिळावा ह्या मागणीला चाकण बाजार समितीतील व्यापाऱ्यांनीसुद्धा पाठिंबा दिला होता. विक्रीसाठी कांद्याचा जेव्हा बाजारात लिलाव केला जाईल, तेव्हा ह्या भावापेक्षा कमी बोली असेल, तर आम्ही स्वतःच ती स्वीकारणार नाही,' असे त्यांनी जाहीर केले. वारकरीच्या ९ फेब्रुवारी १९८०च्या अंकात त्यांनी तसे एक पत्रकच प्रसिद्ध केले होते.

 यावेळी आंदोलनाचे स्वरूप काय असावे ह्याबद्दल जोशींनी बऱ्याच विस्ताराने मांडणी केली होती. सुरुवातीलाच त्यांनी म्हटले होते की सध्या शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणूच नये; कारण एकदा तो बाजारात आणला, की मग परत तो आपल्या शेतावर नेता येत नाही, मिळेल त्या भावाला विकावा लागतो. त्याऐवजी आपल्या शेतावरच जिथे सावली असेल किंवा कोरडी जमीन आणि वर छप्पर असेल अशा जागी शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवावा; २०% खाद (कांद्यातील पाण्याचे खताच्या वापरामुळे वाढलेले प्रमाण) असेल तर किमान ५० रुपये क्विटल भाव मिळावा, व अजिबात खाद नसेल, म्हणजेच कांद्याचे ढीग उत्तम असतील, तर किमान ७० रुपये भाव मिळाला पाहिजे. तसा भाव मिळेल, तेव्हाच तो कांदा बाजारात आणावा.

 अनेक शेतकऱ्यांना घेतलेली कर्जे फेडण्याची निकड लागलेली असते आणि त्यामुळे कांदा बाजारात आणण्याची ते घाई करतात. शेतकऱ्यांना कर्जाबद्दल सवलती देण्याच्या अनेक घोषणा झालेल्या आहेत. तेव्हा येत्या दोन-तीन महिन्यांत भांडीकुंडी उचलण्याच्या घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. पण जर भांडीकुंडी जप्त करण्याचे वा जमिनीचे लिलाव पुकारण्याचे प्रयत्न झालेच, तर गावातील सर्व शेतकऱ्यांनी तोट्यात कांदा विकणे भाग पाडू नका अशी विनंती त्या अधिकाऱ्यास करावी. एवढे करूनही त्यानी आपला हेका कायमच ठेवला, तर सर्व शेतकऱ्यांनी आलेल्या अधिकाऱ्यास शांतपणे व संपूर्ण अहिंसात्मक मार्गाने 'घेराव' घालावा. अशा त-हेने सत्याग्रह करून शेतकऱ्यांनी आपला निर्धार दाखवला पाहिजे.

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१३३