पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 Everybody loves a good drought हे मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पी. साईनाथ यांचे गाजलेले पुस्तक मुख्यतः भारतीय शेतकऱ्याच्या दुर्दशेबद्दल आहे. पण १९९६ साली प्रकाशित झालेल्या या ४७० पानी पुस्तकात याच क्षेत्रात आपले सर्वस्व ओतून अनेक वर्षे काम करणारे शरद जोशी आणि शेतकरी आंदोलन यांच्याविषयी काहीही नाही. India after Gandhi या रामचंद्र गुहा यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकातही जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांची अवघ्या आठ ओळींत बोळवण केलेली आहे व तीही महेंद्रसिंग टिकैत यांच्यासह त्यांना एकत्र गुंफून. ती अगदी अन्यायकारक आहे असे मला वाटले. आपल्या या बहुचर्चित ८९८ पानी ग्रंथात गुहांनी काढलेला निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे : जोशी आणि टिकैत या दोघांचाही आपण ग्रामीण जनतेसाठी बोलत आहोत असा दावा होता. वस्तुतः ते दोघेही ट्रॅक्टर आणि विजेचे पंप वापरणाऱ्या मध्यम व सधन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते. गरीब शेतकरी त्यांच्या कक्षेत नव्हतेच. (गांधीनंतरचा भारत, मराठी अनुवाद : शारदा साठे, मॅजेस्टिक प्रकाशन, मार्च २०११, पृष्ठ ६८४) शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या असंख्य शेतकऱ्यांना मी स्वतः भेटलो होतो. त्यांच्यापैकी अगदी क्वचितच कोणी टॅक्टर बाळगणारे होते. गहांच्या पुस्तकातील मजकूर उघड उघड चुकीचा होता. अशाच स्वरूपाच्या उल्लेखांनी, किंवा अनुल्लेखांनी, जर भावी पिढ्यांसाठी इतिहास लिहिला जाणार असेल, तर तो सत्याचा मोठा विपर्यास असणार होता.
 अशा गैरसमजांची कारणे अनेक असणार, पण त्यांतील एक मोठे कारण म्हणजे शरद जोशींच्या जीवनाचे व एकूणच शेतकरी संघटनेच्या इतिहासाचे समग्र व विश्वासार्ह दस्तावेजीकरण करणाऱ्या पुस्तकाचा अभाव. त्यांचे चरित्र जाणून घ्यावे असे ज्यांना वाटेल त्यांच्यासाठी तो पर्याय उपलब्ध व्हायला हवा या भूमिकेतून मी हे चरित्र लिहायला प्रवृत्त झालो.

 यावर चार-पाच वेळा झालेल्या चर्चेत जोशींनी सुचवल्याप्रमाणे मी त्यांना २१ मे २०१२ रोजी चरित्रलेखनाचा एक तीन-पानी प्रस्ताव दिला व त्यावर विस्ताराने चर्चा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या देवी ऑर्किंडमधल्या फ्लॅटवर प्रमुख सहकाऱ्यांची बैठकही बोलावली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक जेवणानंतर संपली. शैलजा देशपांडे, गुणवंत पाटील हंगरगेकर, अजित नरदे, श्रीकांत अनंत उमरीकर, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनंत गणेश देशपांडे, संजय सुरेंद्र कोले, वामनराव चटप, रवी देवांग, जगदीश ज. बोंडे, अनिल ज. धनवट, सुरेशचंद्र म्हात्रे, दर्शिनी भट्टजी, बद्रीनाथ देवकर (ज्यांचे नाव पुढे प्रकल्प समन्वयक म्हणून छापले गेले) आणि इतरही काही प्रमुख सहकारी हजर होते. जोशींच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकाला प्रस्तावाची प्रत दिली व बैठकीत चर्चाही झाली. ह्या प्रकल्पात त्या सगळ्यांचा सहभाग जोशींना हवा होता. जोशींनी आणखी एक केले. शेतकरी संघटक या संघटनेच्या मुखपत्राच्या पुढच्याच, म्हणजे, ६ जून २०१२च्या अंकात ह्या संकल्पित चरित्राविषयी एक पूर्ण पान निवेदन त्यांनी प्रसिद्ध करवले. त्यात एकूण चरित्रप्रकल्पाची माहिती होती व सर्वांनी त्यात सहकार्य द्यावे असे कार्यकारिणीसदस्यांच्या नावाने एक आवाहनही होते. त्यामुळे

१४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा