पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इंद्रजित भालेराव यांनी लगेच होकार दिला व त्यांचे लेखही लौकरच मिळाले. विनय हर्डीकर यांनी मात्र नकार दिला; स्वतःऐवजी राजीव बसर्गेकर यांचे नाव त्यांनी सुचवले व पुढे बसर्गेकरांचा लेख मिळालाही.
 २७ जून २००९ रोजी त्या लेखाला अंतिम रूप देण्यापूर्वी काही शंकांचे निरसन करावे, म्हणून जोशींची एक विशेष भेट घेतली. माझ्याच विनंतीला मान देऊन ते आमच्या घरी आले होते. सकाळी त्यांच्या एका शाळकरी मित्राच्या घरचे लग्नकार्य होते आणि संध्याकाळी डॉक्टरची अपॉइंटमेंट, "आता हे मधले पाच-सहा तास मी अगदी पूर्ण मोकळा आहे. विचारा काय ते," औपचारिक गप्पा संपताच त्यांनी सुरुवात केली. त्या प्रदीर्घ भेटीत आम्ही खरे जवळ आलो. परिणामतः तो राजहंस एक या शीर्षकाचा तो लेख बराच मोठा झाला.
 ऑक्टोबर २००९च्या त्या शरद जोशी विशेषांकाचे प्रकाशन २५ सप्टेंबर रोजी पुण्यातल्या एसेम जोशी हॉलमध्ये पार पडले. सभागृह तुडुंब भरले होते. त्या प्रसंगी रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही केला गेला. (आमचे शेजारी बद्रीनाथ देवकर म्हणजे रावसाहेब शिंदे यांचे जावई आणि शरद जोशींचे अगदी राम-हनुमान शोभावे इतके परमभक्त - ह्या दोन मोठ्या व्यक्तींशी आम्हांला जोडणारा हा दुवा.) समारंभाच्या शेवटी शेतकरी आंदोलनाचे प्रथमपासून साक्षीदार असलेले व 'साप्ताहिक सकाळ'चे संपादक म्हणून नुकतेच निवृत्त झालेले सदा डुंबरे यांनी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली. मुलाखतीच्या शेवटी जोशींनी काहीसा दुःखद सूर लावला होता. त्यांचे शेवटचे वाक्य होते – “This is my private hell. But I must tell you, I am so proud of my private hell.” त्या एका प्रसिद्ध अमेरिकन गाण्यातील ओळींत त्यांची त्यावेळची एकूण मनःस्थिती प्रतिबिंबित झाली असावी. मुलाखतीचा तो शेवट मनाला चटका लावून गेला.
 अंतर्नादने काढलेल्या विशेषांकाबद्दल जोशींना समाधान वाटले होते. अंकाबद्दलच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्यापाशी येत होत्या. “यामुळे मी चांगल्या वाचकांच्या एका वर्तुळात गेलो. तुमच्यासारख्या राजवाड्यांची आम्ही वाटच पाहत होतो," असे ते मला म्हणाले. ते ऐकून खरे तर मला धक्काच बसला. कारण त्यापूर्वी कधीही त्यांनी माझी किंवा अंतर्नादची एका शब्दानेही स्तुती केली नव्हती; कधीच काही कुतूहलही दाखवले नव्हते. योगायोगाने त्याच वर्षी त्यांच्या अंगारमळा पुस्तकाला राज्यशासनाचा आत्मकथन विभागासाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला. इतरही काही पुरस्कार लगोलग मिळाले. पुढच्याच वर्षी त्यांना चतुरंग ह्या मुंबईतील प्रख्यात सांस्कृतिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला.

 दरम्यान त्यांचे चरित्र लिहायचा विचार पिच्छा सोडेना. त्यांच्या स्वत:च्या लेखनात त्यांचे अथपासून इतिपर्यंतचे चरित्र असे कुठेच उभे राहत नव्हते; इतरही कोणी तसे चरित्र लिहिलेले नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी जे कार्य केले, ते खूप ऐतिहासिक महत्त्वाचे आहे याची एव्हाना खात्री पटली होती, पण तरीही त्यांच्याविषयी पुरेशी माहिती अनेक विचारवंतांना नाही हेही जाणवत होते.

अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ◼ १३