पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इथे लागले होते. एक दिवस एका रुग्णाला घेऊन जोशी आरोग्य केंद्रात आले व त्यावेळी त्यांचा व अष्टेकरांचा प्रथम परिचय झाला. परिसरातील आरोग्याबद्दल दोघांची खूप चर्चा व्हायची. डॉ. रत्ना पाटणकर यांनी जोशींनी आयोजित केलेल्या एका भव्य मोर्यातही मोलाचे वैद्यकीय साहाय्य दिले होते. पुढे त्याबद्दल येणारच आहे. १९८३पर्यंत डॉ. अष्टेकर या केंद्रात कार्यरत होते. त्यानंतरही ह्या ध्येयवादी जोडप्याने अनेक वर्षे ग्रामीण भागातच रुग्णसेवा केली. आता ते नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. दोघांनीही शेतकरी संघटनेत अगदी झोकून देऊन काम केले. शरद जोशींच्या प्रत्येक आजारपणात डॉ. अष्टेकर त्यांच्यासोबत असत.

 आंबेठाणला आल्यावर जोशींनी बराच पुढाकार घेतलेली दुसरी सामाजिक समस्या म्हणजे पक्क्या रस्त्याचा अभाव. आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी, आजारपणात त्वरित उपचार मिळावेत म्हणून, शेतीमाल कमीत कमी वेळात बाजारात पोचवण्यासाठी चांगला रस्ता अत्यावश्यक होता. इथल्या एकूण मागासलेपणाचे रस्ते नसणे हे एक मोठेच कारण होते. आंबेठाणवरून जाणाऱ्या चाकण ते वांद्रे ह्या ६४ किलोमीटर रस्त्यापैकी फक्त चाकण ते आंबेठाण हा सात किलोमीटरचा रस्ता त्यातल्या त्यात नीट असायचा. बऱ्याच वर्षांपूर्वी, आधी १९६७ साली व नंतर १९७३ साली, दुष्काळात शेतकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणन काढलेल्या कामांचा एक भाग म्हणून तो सरकारने तयार करवला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी त्यासाठी श्रमदान केले होते. पण नंतरच्या काही वर्षांत त्याची पुरती दुर्दशा झाली होती. खोऱ्यात एकूण २७ गावे होती व त्यांपैकी २४ गावे अशी होती, की एकदा पावसाळा सुरू झाल्यावर पुढचे निदान सहा महिने त्या गावांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध राहायचा नाही; कारण मोडका-तोडका जो रस्ता असायचा, तो पहिल्या दोन-चार पावसांतच वाहून जायचा. गावातली माणसे मग गावातच अडकून पडायची. भाजीपाला वगैरे अक्षरशः कवडीमोलाने विकून टाकावा लागायचा; किंवा कधीकधी चक्क फेकून दिला जायचा. कोणी आजारी पडले तरी चाकणला जायची काही सोय नाही; रुग्णाला डोली करून नेणे हा एकमेव पर्याय असायचा. पण तेही फार अवघड असायचे कारण ह्या भागातील बरेचसे तरुण मुंबईला डबेवाला म्हणून नोकरी करायचे; उरलेली वस्ती मुख्यतः बायका, मुले व वृद्ध यांची. गावातली एखादी बाळंतीण अडली आणि घरच्यांसमोर तडफडून मेली, असे दर पावसाळ्यात एकदातरी घडायचेच. हा रस्ता पक्का व्हावा अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने जोशींनी केली होती. शेतकऱ्यांची संघटना बांधायचे ठरवल्यावर त्यांनी लोकजागृतीसाठी हाती घेतलेला हा पहिला प्रकल्प होता. ह्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोशींनी आयोजित केलेला मोठा मोर्चा; चीनच्या माओ त्से तुंगच्या शब्दांत सांगायचे तर – लाँग मार्च.

 वांद्रे येथून २४ जानेवारी १९८० रोजी हा मोर्चा सुरू होणार होता व ६४ किलोमीटर चालून २६ जानेवारीला चाकणला पोचणार होता. त्याच्या तयारीसाठी म्हणून आधीचे दोन महिनेतरी जोशींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून प्रयत्न केले होते. 'घरातल्या जनावरांच्या

१२८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा