पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चुका लक्षातच येत नाहीत. आणि बाबूलालला कुठल्याच चुका चुका वाटत नाहीत. असा सगळा आनंद! भावी काळातले राजवाडे वारकरीचे अंक घेऊन बसतील, तेव्हा मुद्रणदोष ओलांडत ओलांडत वाचताना त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्याखेरीज राहणार नाहीत. (वारकरीची जन्मकथा, आठवड्याचा ग्यानबा, १ ते ८ मार्च १९८८, पृष्ठ ९)

 चळवळ वाढत गेली तसतसा जोशींना स्वतःला त्यासाठी पुरेसा वेळ देता येईना. आधी काही अंक नियमित दर आठवड्याला निघाले, मग मात्र ते अनियमित स्वरूपात निघू लागले. सुमारे सव्वा वर्षाने वारकरी बंदच पडले. १७ जानेवारी १९८१चा अंक हा वारकरीचा शेवटचा अंक. पण त्याने त्या मर्यादित काळात महत्त्वाची भूमिका बजावली. भामनेर खोऱ्यात, पुणे जिल्ह्यात आणि खरे तर इतरही अनेक जिल्ह्यांत शेतकरी संघटनेची त्यामुळे तोंडओळखतरी झाली. अनुयायांशी संपर्क साधण्याचे ते एकमेव साधन होते. शरद जोशींचा थेट सहभाग असलेलेही हे एकमेव नियतकालिक. संघटनेची म्हणून त्यानंतर 'आठवड्याचा ग्यानबा' व 'शेतकरी संघटक' ही दोन मुखपत्रे निघाली व त्यांतून जोशींचे लेखन प्रसिद्धही होत गेले, पण त्यांच्या व्यवस्थापनात जोशींचा थेट सहभाग नसायचा.

 लोकांनी जर आपल्याबरोबर यावे असे वाटत असेल, तर त्यांच्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत त्यात तुम्हालाही स्वारस्य असावे लागते. म्हणूनच आंबेठाणमध्ये आल्यापासून जोशींनी दोन गोष्टींवर बरेच लक्ष केंद्रित केले होते. पहिली म्हणजे गावातले आरोग्य.

 आरोग्याचा प्रश्न जोशींना फारच गंभीर वाटत होता. मुळातच कुपोषित असलेले गावकरी कुठल्याही रोगाला सहज बळी पडत असत. त्यांची एकूण कार्यक्षमताही कुपोषणामुळे खूप कमी झालेली असायची. भामनेरच्या त्या खोऱ्यात चाकण सोडले तर कुठे एकही डॉक्टर नव्हता. एखादा पोरगा खप आजारी पडला तर शेतकरी नाइलाजाने त्याला बाजाराच्या दिवशी थेट चाकणला घेऊन जायचा. चाकणला सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. पण तिथे कोणीच डॉक्टर हजर नसतो असे त्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले होते. गावकऱ्यांच्या मते तिथे औषधेही उपलब्ध नसत. तिथले सरकारी कर्मचारी खेडूतांशी इतक्या मग्रुरीने वागत की पुन्हा त्या दवाखान्याची पायरीही चढू नये असे त्या शेतकऱ्याला वाटायचे. मग खासगी डॉक्टरकडे जाणे हाच एक रस्ता असायचा. तो खासगी डॉक्टर रुग्णाला तपासून काहीतरी औषधे लिहून द्यायचा. पण औषधांच्या दुकानात गेले आणि औषधांची किंमत ऐकली की तो शेतकरी पोराला घेऊन तसाच गावी परत जायचा. कारण तेवढे पैसे खर्च करणे त्याला परवडायचे नाही. हे सारे नेहमीचेच होते.

 डॉ. शाम अष्टेकर यांच्याविषयी आणि डॉ. रत्ना पाटणकर यांच्याविषयी इथे लिहायला हवे. पुढे या दोघांनी विवाह केला पण सुरुवातीला ते एकेकटेच चाकणच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. ऑक्टोबर १९७८मध्ये पुण्याहून एमडी केल्यावर डॉ. अष्टेकर

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१२७