पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थापनतज्ज्ञांनीदेखील या डबेवाल्यांवर पुढे अभ्यासलेख लिहिले आहेत. मंडळाने मुंबईत त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. बातमीत म्हटले होते,

पूजेपूर्वी शरद जोशी यांची ढोल-ताशे वाजवत मुंबईत मिरवणूक काढली गेली. त्यानंतर पूजेला जोडूनच जाहीर सभाही झाली व त्या सभेत जोशी यांचा जाहीर सत्कार केला गेला. जोशी यांनी सुमारे तासभर भाषण केले. डबेवाहतूक मंडळाशी असलेल्या आपल्या ऋणानुबंधांचा जोशी यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व शेतकरी संघटनेबद्दल माहिती दिली. नंतर मंडळाने साप्ताहिक वारकरीला रुपये ५०१ देणगीदाखल दिले. सभेनंतर रात्री भजनी भारुडाचा कार्यक्रम झाला.

(वारकरी, ३ जानेवारी १९८१)

 पुढे पुढे मात्र दर आठवड्याला वारकरी काढायचा जोशींना त्रास होऊ लागला. बाबूलालना ठरलेल्या वेळेत काम करायची फारशी सवय नव्हती. ह्याचे एक कारण म्हणजे गावात त्यांचा छापखाना हा एकमेव छापखाना होता; म्हणजे त्यांची मक्तेदारीच होती. छापखान्यात पत्रिका छापायला उशीर होत आहे, म्हणून लग्नाची तारीख पुढे ढकलली गेल्याचीही उदाहरणे होती! पण साप्ताहिक म्हटले की पोस्टाच्या नियमानुसार ठरलेली तारीख पाळावीच लागे. त्यामुळे शनिवारी दुपारी अंक बाहेर पडणे आवश्यक असायचे. दर बुधवारी रात्री जागून जोशी सगळा मजकूर तयार करायचे, हाताने लिहून काढायचे. गुरुवारी सकाळी सकाळी तो बाबूलालकडे द्यायचे, जेणेकरून त्यांना छपाईसाठी निदान दोन दिवस मिळावेत. पण बाबूलाल यांची आणखी एक सवय म्हणजे रात्री तीन वाजेपर्यंत गावातल्या मारुतीच्या देवळात गप्पा छाटत बसायचे आणि सकाळी पार दहा वाजेपर्यंत ताणन द्यायची. त्यांचा छापखाना व घर जवळजवळ होते. सकाळी जोशी मजकूर घेऊन त्यांच्याकडे जात, तेव्हा ते झोपलेलेच असत. बाबूलाल ह्यांच्या पत्नी सुषमा “अहो, तुमचा सासरा आला आहे बघा!" असे म्हणून गदागदा हलवत पतीला उठवायच्या. मग दुपारपर्यंत जुळारी शोधण्यात वेळ जायचा. कधी तो मिळायचा, कधी नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा हाच प्रकार. शेवटी कसाबसा अंक शनिवारी सकाळी तयार व्हायचा. खूपदा चाकणला अर्धवट तयार झालेला मजकूराचा कंपोझ पुण्याला नेऊन तिथे अंक पुरा करावा लागे. जोशी म्हणतात,

 बाबूलाल घड्याळ काय, पण कॅलेंडरकडेसुद्धा लक्ष देणे म्हणजे, विलायतेतून आलेल्या लोकांचे फॅड समजायचा! साप्ताहिक वारकरीचा प्रत्येक अंक म्हणजे जुळारी, छापखाना, बाबूलाल आणि वेळ ह्यांच्याशी घेतलेली निकराची झुंज व्हायची. छपाईंकामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड प्रमाणावर राहून जाणारे मुद्रणदोष. मला स्वतःला मीच लिहिलेला मजकूर छापील स्वरूपात तपासता येत नाही. लिहिलेली वाक्ये मनात इतकी पक्की बसलेली असतात, की मुद्रणातल्या

१२६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा