पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पवार यांनी अगदी मुक्त कंठाने चाकणच्या कांद्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, चाकणच्या कांद्याला दुबई व कुवेत येथील मार्केटमध्ये ७०० रुपये क्विटल भाव मिळत आहे. मी त्यांना ३२ कोटी रुपयाचा कांदा व इतर भाजीपाला पुरवायचा करार केला आहे. तुम्ही भरपूर कांदा पिकवा. तुम्हाला किमान ७० रुपये क्विटल भाव नक्की मिळेल. शेतकऱ्याच्या जीवनातील ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर शरद पवार योग्य निर्णय घेतील अशी खात्री बाळगू या.

 अरबी मुलुखात क्विटलला ७०० रुपये भाव मिळत असताना चाकणच्या बाजारात इथल्या शेतकऱ्याला मात्र नाफेडतर्फे क्विटलला जेमतेम ४५ ते ६० रुपयेच भाव मिळत होता, व तोही प्रत्येक वेळी संघर्ष करून मिळवावा लागत होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.
 तिसऱ्या अंकापासूनच 'इंडिया विरुद्ध भारत' ही शब्दरचना अंकाच्या शीर्षस्थानी आली. 'भारत झिंदाबाद, इंडिया मुर्दाबाद' ही घोषणाही लगेचच पहिल्या पानावर आली. पहिल्या अंकात फक्त 'भारत झिंदाबाद' होते, त्याच्याखाली आता 'इंडिया मुर्दाबाद' आले. ह्या वाढत्या संघर्षाचे प्रतिबिंब अंकातील मजकुरावरही पडत गेल्याचे जाणवते. वर्गणीदारांची व आजीव वर्गणीदारांची यादीही अधूनमधून प्रसिद्ध होत होती. हळूहळू वारकरीचा थोडाफार विस्तार होऊ लागला. चौथ्या अंकात पहिल्याच पानावर २२ आजीव सदस्यांची व ४२ वार्षिक वर्गणीदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ही संख्या तशी अत्यल्प वाटते, पण शेतकरीवर्गातून वाचक मिळणे सोपे नव्हते.
 अंकात व्यावसायिक माहितीही असायची. कांद्याचा उत्पादनखर्च कसा काढायचा. पिकांना होणारे वेगवेगळे रोग व त्यावरील उपाय वगैरे माहिती असायची. ग्रामविकासाच्या योजनांची माहितीदेखील असायची. बरीच पत्रे त्याबाबत असत. वाचकपत्रांना अंकात आवर्जुन अर्धाएक पान स्थान दिले जायचे. संपूर्ण भामनेर खोऱ्याच्या पंचवार्षिक विकासाचा एक विस्तृत आराखडाही एका अंकात प्रसिद्ध झाला होता. संघटनेतर्फे तरुण शेतकऱ्यांसाठी व्हॉलीबॉलस्पर्धादेखील आयोजित केल्या गेल्या होत्या व त्याचेही वृत्त अंकात आले होते. शेतकरी एकत्र आणण्यासाठी सर्वच मार्गाचा अवलंब केला जात होता, वावडे असे कशाचेच नव्हते.

 अंकातील एक वेधक वृत्त म्हणजे मुंबईतील 'जेवण डबे वाहतूक मंडळ' यांनी मुंबईला २० डिसेंबर १९८० रोजी केलेल्या सत्काराचे. भामनेर खोऱ्यातील अनेक तरुण मुंबईला डबेवाला म्हणून नोकरी करत. ते फारसे शिकलेले नसत, पण त्यांचे काम वक्तशीरपणा व शिस्त यांसाठी खूप वाखाणले जाई. लांब लांब राहणाऱ्या मुंबईकर कुटुंबांतून सकाळी नऊदहाच्या सुमारास जेवणाचे डबे गोळा करायचे व दुपारी बरोबर बारा-एकच्या आत ते फोर्टसारख्या लांबच्या भागातील ज्याच्या-त्याच्या कार्यालयात पोचवायचे काम ते करत. संध्याकाळी ते डबे घरोघर परतही पोचवत. ह्या कामात कधीही हयगय होत नसे व घरचे सात्त्विक अन्न खायला मिळाल्यामुळे मुंबईकर त्यांच्यावर खूष असत. बड्या

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१२५