पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांडवल भरपूर गुंतवले होते, विहिरींचे पाणी होते, अवजारे-खते-बियाणे इत्यादी सर्व आधुनिक गोष्टींचा वापर त्यांनी केला होता.
 पण हे सगळे करूनही त्यांची शेती किफायतशीर नव्हती. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जे-जे काही पिकवतो त्याला बाजारात मिळणारा भाव इतका कमालांचा अपुरा आहे, की त्यातून ही शेती किफायतशीर होणे कधीच शक्य नाही, आणि परिस्थिती अशी आहे हा केवळ एखादा अपघात नसून, देशाने स्वीकारलेल्या अत्यंत चुकीच्या व शेतीला मारक अशा तथाकथित सोव्हिएत धर्तीच्या समाजवादी धोरणाचा तो परिणाम आहे; त्या विकृत व्यवस्थेत देशातील अभिजनवर्गाचे हित गुंतलेले आहे व म्हणूनच ते धोरण चालू राहिले आहे, ह्या निष्कर्षाप्रत आता जोशी आले होते. खंडीभर भले थोरले ग्रंथ वाचून आणि असंख्य परिसंवादांत भाग घेऊन जे सत्य कधीच उमजले नसते, ते आता त्यांना अनुभवांतून नेमके उमजले होते. ही भ्रष्ट यंत्रणा बदलण्यासाठी लढा उभारायचा त्यांनी पक्का निर्धार केला होता. म्हणूनच जवळ जवळ सगळा वेळ संघटना उभारण्यासाठीच द्यायचा असे त्यांनी ठरवले होते.
 परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून कसलाच प्रतिसाद मिळेना. दिवसभर जोशी आणि त्यांचे काही निवडक सहकारी अगदी आतुरतेने इतर कोणी शेतकरी बांधव येतात का, याची वाट पाहत असत. पण फारसे कोणी येतच नसत. त्यातूनही कोणी आलेच तरी ते खूप घाईत असायचे, चाकणमधली आपली इतर कामे करता करता ते केवळ 'शेतकरी संघटना हा प्रकार तरी काय आहे?' एवढे बघण्यापुरतेच डोकावून जायचे; नंतर पुन्हा ते तोंड दाखवत नसत. संघटना बांधणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसे. कधीकधी तासन्तास तिथे बसून वेळ अगदी फुकट गेला असे जोशींना वाटायचे. शेतकऱ्यांना एकत्र आणणे फारच अवघड आहे; त्यामानाने कामगारांची एकजूट उभारणे तुलनेने सोपे असते, असे कार्ल मार्क्स म्हणाला होता ते जोशींना अशा वेळी आठवू लागे.
 शेवटी मग पर्वत महमदाकडे आला नाही, तर महमदाने पर्वताकडे जावे, ह्या न्यायाने, शेतकरी कार्यालयात यायची वाट न बघता पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा आपणच स्वतः गावोगावी जायचे, त्यांना भेटायचे, आपल्यावरील अन्यायाची त्यांना जाणीव करून द्यायची, त्याच्या निवारणार्थ एकत्र येण्यातले फायदे त्यांना पटवायचे व संघटनेचा प्रसार करायचा असे त्यांनी ठरवले. त्या दृष्टीने सकाळी थोडा वेळ ऑफिस व नंतर दिवसभर भटकंती हा प्रकार सुरू झाला.
 सुरुवातीपासून आंदोलनात असलेले चाकणजवळच्या म्हाळुगे गावचे श्याम पवार म्हणतात,

 "संघटनाबांधणीच्या सुरुवातीच्या त्या काळात जोशी आपल्याजवळचे तीन-चार सहकारी घेऊन भामनेर खोऱ्यातील एखाद्या गावात जात. आमच्यासोबतच झाडाखाली बसून पिठलं, भाकरी, कांदा खात. कधी आम्हाला एखाद्या धाब्यावर घेऊन जात. बिल तेच देत. कधी जीपने येत, पण कधी रस्ता नसला तर बरेच अंतर पायीदेखील जावे लागे. त्यासाठी स्थानिक जत्रा, यात्रा किंवा बाजाराचा दिवस ते पकडत. बरोबरचे सहकारी पारावर किंवा

१२०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा