पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरील बिना अपार्टमेंट्स'मध्ये ते तेव्हा राहत होते. तिथेच आमच्या दोन-तीन प्रदीर्घ मुलाखती झाल्या. त्यांच्या आधारे, व त्यांनी दिलेल्या त्यांच्या इतर साहित्याच्या आधारे, मी त्या लेखाचे शब्दांकन केले होते - विचार अर्थातच त्यांचेच होते व लेख छापण्यापूर्वी त्यांनी तो तपासून आणि थोडाफार बदलूनही दिला होता. पुढे फेब्रुवारी २००७च्या अंतर्नादमध्ये 'समाजसेवेची दुकानदारी नको!' या शीर्षकाखाली, त्यांनी केलेल्या आणखी काही बदलांसह व टीका थोडीशी सौम्य करून, तो पुनर्मुद्रितही झाला.
 त्यानंतरही आमच्या भेटी अधूनमधून होत राहिल्या – प्रत्येक भेट पुनर्भेटीची ओढ लावणारी होती. त्यांच्यावर काहीतरी लिहावे असे खूपदा वाटले; पण प्रत्येक वेळी जाणवले, की हा तर एखाद्या कादंबरीचा विषय आहे; लेखात तो कसा हाताळणार? पण एखाद्या जीवित व्यक्तीवर कादंबरी लिहिणे तसे अवघडच! चरित्र लिहावे म्हटले तर त्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकेन असे वाटत नव्हते. ३ सप्टेंबर २००९ रोजी ते पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करणार होते व त्याचा उल्लेख त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या बोलण्यात झाला होता. त्या निमित्ताने मग त्यांच्यावर अंतर्नादचा एखादा विशेषांकच काढावा असे ठरले व मग त्या अंकासाठी मीही एक लेख लिहायचे ठरवले.
 त्या अंकाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून मुद्दाम आंबेठाण येथील अंगारमळ्यात जाऊन आलो. ते जोशींचे अधिकृत निवासस्थान आणि शेतकरी संघटनेचे मुख्य कार्यालय. तिथे जायचा तो पहिलाच प्रसंग. आंबेठाणला जाण्यासाठी चाकण बसस्टँडवर उतरावे लागते. संघटनेचे पहिले आंदोलन तीस वर्षांपूर्वी इथेच लढवले गेले. त्या दिवशी मात्र त्या क्रांतिकारी आंदोलनाची कुठलीही खूण त्या परिसरात दिसली नाही.
 अंगारमळ्यात पोहोचल्यावर बघितले तर अगदी शुकशुकाट होता – जिथे शूटिंग होणे केव्हाच बंद झाले आहे अशा एखाद्या मुंबईतल्या जुनाट स्टुडिओत असावा तसा. राज्यसभा सदस्य असल्याने जोशींचा मुक्काम तेव्हा बहुतेक वेळ दिल्लीतच असायचा. त्यांचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे तिथेच एका खोलीत राहत होते; आजही तीच परिस्थिती आहे. बबन शेलार हे जोशींचे सारथी-सचिव-सहकारीदेखील तिथेच एका आउटहाउससारख्या जागेत आपल्या कुटुंबीयांसह राहत होते; पण मी गेलो तेव्हा ते तिथे नव्हते. एका नि:शब्द उदासीचे सावट अंगारमळ्यावर जाणवत होते. एकेकाळी इथून सुरू झालेल्या आणि बघता बघता लक्षावधी लोकांना आपल्या कवेत घेणाऱ्या शरद जोशी नामक वादळाचे ते विस्मृतीच्या अथांग पोकळीत विरून जायच्या आत शब्दांकन व्हायला हवे, ही जाणीव त्या क्षणी मला प्रकर्षाने झाली.

 आंदोलनाच्या साऱ्या मंतरलेल्या दिवसांचे म्हात्रे साक्षीदार होते व जोशींची निवासाची खोली, त्यांचा ग्रंथसंग्रह, एकेकाळच्या लीलाताईंच्या पोल्ट्रीत थाटलेली प्रबोधिनीची शिबिरे घ्यायची जागा, भिंतींवरची पोस्टर्स, फोटो वगैरे सगळा इतिहास - खरे तर अवशेष - ते दाखवत होते; भूतकाळ जिवंत करत होते. अंतर्नादसाठी कोणाकोणाकडून लेख मागवावे याचीही नंतर चर्चा झाली. म्हात्रेनी सुचवलेली नावेच नक्की केली. विद्युत भागवत आणि

१२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा