पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत असत. कांद्याचे पुरुष-पुरुष उंचीचे ढीग यार्डाच्या बाहेरही रस्त्याकडेला रचलेले असत. त्यांच्यामधून वाट काढत पुढे जावे लागे. एखाद्या वेळी भाव घसरले आणि लिलावात कोणी अधिकची बोली लावायलाच तयार होत नसेल, तर अशावेळी मग एखादा शेतकरी स्वतःच जोशींकडे येई. त्यांची मदत घेई. यातूनच मग एखाद्या कायमस्वरूपी संघटनेची गरज सर्वांना पटू लागली.
 या गरजेपोटीच मग १९७९ सालच्या क्रांतिदिनी, म्हणजे ८ ऑगस्ट रोजी, शेतकरी संघटना स्थापन करण्यात आली. चाकण बाजारपेठेसमोरच एक तकलादू ऑफिस थाटले गेले. बाबूलाल यांच्या छापखान्यातच, जागा अगदी छोटी असली तरी मोक्याच्या जागी होती. दोन टेबले, चार खुर्त्या आणि दोन बाकडी मावत होती. दारावरच शेतकरी संघटना' अशी पाटी लावली होती. त्या नावाने लेटरहेड छापून घेतली.
 बाजारपेठेचे गाव परिसरातील शेतकऱ्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. बहुतेक ठिकाणी 'आठवडी बाजार' भरतो व कुठलाही शेतकरी त्याला येतोच येतो. त्याचवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात जाऊन शेतीमालाचे प्रत्यक्षात काय भाव सुरू आहेत हे बघतो. त्याला स्वतःच्या कुटुंबासाठीदेखील अनेक गोष्टींची खरेदी करायची असते. आज इंटरनेट व संगणक आल्यामुळे ही परिस्थिती निदान काही प्रगत शेतकऱ्यांसाठी तरी पालटली आहे; जगभरातले बाजारभाव शेतकरी आपल्या घरी बसल्याबसल्या शोधू शकतो; पण १९७९ सालची परिस्थिती फार वेगळी होती.
 संघटना उभारण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याशी संपर्क साधायचा असेल तर बाजाराच्या गावी त्याला गाठणे हा एकमेव मार्ग होता. बाजाराच्या दिवशी तिथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने आपले काम संपल्यावर थोडा वेळ तरी संघटनेच्या ऑफिसात डोकवावे, आपल्या गाहाण्यांची चर्चा करावी ही अपेक्षा असायची. फक्त शेतीविषयक चर्चा नाही, तर एकूणच विकासविषयक चर्चा करण्यासाठी. अशा चर्चेतून शेतकऱ्यांशी जवळीक साधणे, आपल्यापुढील समस्यांची त्यांना जाणीव करून देणे, त्या सोडवण्यासाठी त्यांना एकत्र आणणे हा संघटनेमागचा मुख्य उद्देश.

 स्वतः शरद जोशी रोज ऑफिसात येऊन बसत. आपल्या स्वतःच्या शेतीकडे आता ते कमी कमी लक्ष देऊ लागले होते. शेती करणे हा जोशींच्या दृष्टीने एक प्रयोग होता व तो करताना त्यांच्यासमोर काही सुस्पष्ट उद्दिष्टे होती. दोन तृतीयांश भारतीय शेती करतात व साहजिकच भारताच्या दारिद्र्याचे मूळ शेतीत आहे हे त्यांना पटले होते; पण ती शेती किफायतशीर का होत नाही हे त्यांना शोधून काढायचे होते. ती किफायतशीर न व्हायची काही कारणे अनेकांनी वेळोवेळी मांडली होती. उदाहरणार्थ, शेतीचे क्षेत्र कमी असणे. भांडवलाची कमतरता. पुरेसे पाणी उपलब्ध नसणे. चांगल्या अवजारांचा अभाव. खते, औषधे व प्रगत बियाणे यांचा पुरेसा वापर न करणे. आणि मुख्य म्हणजे शेतकरी अशिक्षित असल्याने आधुनिक व्यवस्थापनतंत्रांचा व तंत्रज्ञानाचा त्याला फायदा न मिळणे. स्वतःच्या शेतीत त्यांनी ह्यातील प्रत्येक अडचणीला उत्तर उपलब्ध करून दिले होते. त्यांचे शेतीचे क्षेत्र पुरेसे होते,

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी११९