पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/११५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रवास केला. आधी एखादा सहकारी बॅटरीवर चालणाऱ्या लाउडस्पीकरवर निवेदन करायचा, 'जगप्रसिद्ध शेतकरी नेते श्री. शरद जोशी आज आपल्या गावात आले आहेत व शेतीप्रश्नावर बोलणार आहेत. तरी सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या भाषणाचा फायदा घ्यावा' अशा स्वरूपाचे ते निवेदन असे. गावभर फिरून ते पुन्हा पुन्हा ऐकवले जाई. हळूहळू गर्दी जमू लागे. आधी बाकीचे बोलत व पुरेशी गर्दी जमली, की जोशी बोलायला उभे राहत. हा प्रकार त्यांनी सातत्याने वर्षभर शे-दीडशे ठिकाणी तरी केला. त्यावेळी कांद्याचा भाव पार कोसळला होता; अगदी क्विटलला २०-२५ रुपयांपर्यंत.
 आता आपले काही खरे नाही याची जाणीव सर्वच कांदा शेतकऱ्यांना झाली. चाकण बाजारसमितीसमोर जोशींनी शेतकऱ्यांचा एक मेळावा घेतला व एकूण परिस्थिती सगळ्यांना समजावून सांगितली. कांद्याला क्विटलमागे ४५ ते ६० रुपये भाव मिळालाच पाहिजे हे जोशींचे म्हणणे सगळ्यांनाच पटले व ती मागणी समोर ठेवून त्यांनी चाकणच्या बाजारपेठेत त्वेषाने घोषणा द्यायला सुरुवात केली. हे पहिले कांदा आंदोलन, शनिवार २५ मार्च १९७८ची ही घटना.
 हे भाव त्यावेळी इतके पडले होते, याचे कारण म्हणजे केंद्र सरकारचे धोरण. मोहन धारिया त्यावेळी केंद्रात व्यापारमंत्री होते. कांद्याच्या भाववाढीमुळे असंतोष पसरतो आहे हे लक्षात घेऊन १९७७ साली कामाची सूत्रे हाती घेतल्याघेतल्याच त्यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली व त्यामुळे एकाएकी कांद्याचे भाव कोसळले. शेतकऱ्यांची दैना उडाली. उत्पादनखर्च तर सोडाच, कांदा शेतातून काढणे व बाजारात आणणे यातला मजुरीचा व वाहतुकीचा खर्चही भरून निघेना. 'या भावात कुठल्याही परिस्थितीत कांदा विकायचा नाही' असे आवाहन जोशींनी केले. चिडलेल्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. आपला कांदा त्यांनी बाजारात आणलाच नाही. बाजारपेठ ओस पडली. सरकारने ४५ ते ६० रुपये क्विटल हा वाढीव भाव बांधून दिला नाही, तर एक एप्रिलपासून शेतकरी रास्ता रोको करतील' असा इशारा लागोपाठ तीन दिवस भरलेल्या शेतकरी मेळाव्यांत तीन वेळा जोशींनी दिला.
 चाकणला काहीतरी गडबड होणार आहे, ह्याची साधारण पूर्वकल्पना स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी कलेक्टरना दिली होती. चर्चेसाठी २९ मार्च रोजी दुपारी कलेक्टरनी एक तातडीची बैठक बोलावली. आपल्या काही साथीदारांसह जोशी पुण्याला कलेक्टरच्या कार्यालयात गेले. चाकणमधले वेगवेगळे राजकीय पक्षांचे पुढारी व बाजारसमितीचे पदाधिकारी पूर्वीच कार्यालयात येऊन पोचले होते. सगळ्या खुर्ध्या त्यांनीच अडवल्या होत्या. जोशींना बसायलाच कुठली खुर्ची रिकामी नव्हती. सगळ्यांचे म्हणणे मांडून झाल्यावर शंकरराव वाघ यांनी जोशीसाहेबांनी आता बोलावे' अशी जाहीर घोषणा केली. तोपर्यंत जोशी नुसतेच एका कोपऱ्यात उभे राहून सगळे ऐकत होते.

 सगळ्या माना चपापून त्यांच्या दिशने वळल्या. कलेक्टरही काहीसे गडबडल्यासारखे झाले. जोशींच्या पार्श्वभूमीची त्यांना थोडीफार कल्पना होती. जरासे उठल्यासारखे करत जोशींसाठी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांसाठी त्यांनी खुर्च्या मागवल्या. जोशींनी मग पुढे

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी११५