पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्षात आलं, की यंदाही काही बायकोला लुगडं घेता यायचं नाही. आणि पोराला चड्डी घेता यायची नाही. तो तसाच घरी गेला. त्याचा चेहरा पाहिल्यावर बायकोच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. तीच त्याला म्हणाली, 'जाऊन द्या, काही वाईट वाटून घेऊ नका. काढीन एवढ्याच लुगड्यावर आणखी एक वर्ष.' दिल्लीत जी माणसं सात रुपयाचं सिनेमा तिकीट वेळ आल्यास पंचवीस रुपयांनादेखील खरेदी करतात, ती माणसं त्यांच्या जेवण्यातला कांदा सव्वा रुपये झाला, की लगेच आरडाओरडा करतात. आणि त्यांना ती भाववाढ टोचू नये, म्हणून शेतकऱ्याच्या घरी काय परिस्थिती असेल याचा जराही विचार न करता सरकार निर्यातबंदी घालतं. (शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती, पृष्ठ ५०-१, पहिली आवृत्ती, नोव्हेंबर १९८२)

 कांद्याचे पीक शेतकऱ्याच्या हाती आले, की निर्यातीवर बंदी घालायची, जेणेकरून शेतकऱ्याला मिळणारा भाव कमीत कमी असेल व व्यापाऱ्यांना तो अगदी स्वस्तात खरेदी करता येईल आणि व्यापाऱ्यांची खरेदी संपली, कांदा त्यांच्या गोदामात गेला, की निर्यातबंदी उठवायची; जेणेकरून तोच कमी भावात घेतलेला कांदा आता व्यापाऱ्यांना वाढीव भावात विकता येईल. १९७८, १९७९, १९८० ह्या तिन्ही वर्षांत हे घडले.
 बऱ्याच वर्षांनंतर, म्हणजे सुमारे २०१४ साली, एका मुलाखतीत जोशींनी ह्या संदर्भात म्हटले होते.
 "कांद्याचा भाव जेव्हा पुण्यात डेक्कन जिमखान्यावर एक रुपया किलो होता, तेव्हा तिथे सिनेमाचे तिकीट एक रुपया होते. आज सिनेमाचे तिकीट किमान शंभर रुपये झाले आहे व तरीही लोक ते तिकीट बिनदिक्कत खरेदी करतातच. मग कांद्याचा भाव १०० रुपये किलो झाला, तर एवढा आरडाओरडा करायचे काय कारण आहे?"

 ह्या सततच्या समस्येचा दोन वर्षे अभ्यास केल्यावर व अनेक कटू अनुभव पदरी जमा झाल्यावर जोशींनी कांद्याला उत्पादनखर्चावर आधारित क्विटलला किमान ४५ ते ६० रुपये भाव मिळालाच पाहिजे असे सर्व शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली. जवळ जवळ रोजच ते चाकणच्या बाजारपेठेत जात. जमेल तेवढ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधत. त्यांना मानणारे काही व्यावसायिक संबंधित होते, ज्यांच्याबद्दल मागील प्रकरणात लिहिलेच आहे. शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात त्या मंडळींचा उपयोग व्हायचाच. पण त्याशिवाय केवळ कांदा आंदोलनामुळे जोडले गेलेले असेही त्यांचे दोन स्थानिक सहकारी होते. एकेकाळी चाकणचे सरपंच राहिलेले व दुकानदारीसह अनेक व्यवसाय केलेले शंकरराव वाघ आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले व गावात छापखाना चालवणारे बाबूलाल परदेशी.

 वाघ, परदेशी आणि जोशी अशा या त्रिकुटाने भामनेर खोऱ्यात असंख्य वेळा एकत्र

११४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा