पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/११३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भाववाढीच्या मुद्द्यावरून होतात. टूथपेस्टपासून मोटारीपर्यंत आणि शर्टापासून पेट्रोलपर्यंत बाकी सगळ्या गोष्टी महाग झाल्या तरी कुरकुर न करणाऱ्या शहरी लोकांना शेतीमालाची भाववाढ मात्र अजिबात सहन होत नाही, लगेच त्याविरुद्ध काहूर उठवले जाते. त्यामुळे शेतीमालाची भाववाढ होऊ नये यासाठी सरकार नेहमीच दक्ष असते. म्हणूनच कांदा हे राजकीयदृष्ट्या तसे खुप संवेदनशील पीक आहे. शहरातून आरडाओरड सुरू झाली, पेपरांतून टीका सुरू झाली, की सरकार घाईघाईने निर्यातबंदी करते. त्यामुळे मग भाव एकदम कोसळतात. शेतकऱ्याला उत्पादनखर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नाही. तसे पाहिले तर शहरी ग्राहकांची संख्या शेतकऱ्यांपेक्षा कमी असते, पण त्यांचे उपद्रवमूल्य खूप असते. ते सुशिक्षित असल्याने आपला विरोध लगेचच व्यक्त करतात. राज्यकर्ते व नोकरशहा, पत्रकार व विचारवंत वगैरे मंडळीही बहुतांशी शहरातच राहत असतात. त्यांच्यापर्यंत ग्राहकाचा असंतोष तत्काळ पोचतो. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीच्या बाबतीत तर हे अधिकच खरे आहे. दिल्लीतल्या बारीकशा घडामोडीचीही दखल शासनाला प्राधान्याने घ्यावी लागते कारण त्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतात.
 याउलट शेतकरी सगळा ग्रामीण भागात असतो. सरकारी धोरणामुळे त्याला प्रचंड त्रास झाला तरी जे होईल ते सहन करायची त्याची एक सवयच असते; गैरसोयी त्याच्या अंगवळणीच पडलेल्या असतात. त्यातून त्याने कधी असंतोष व्यक्त केला तरी त्याचा आवाज इतका क्षीण असतो, की राजधानीपर्यंत तो पोचतच नाही! कांद्याच्या बाबतीत जोशींना हे वरचेवर जाणवायचे.
 ह्याबाबतचा एक विदारक आणि हृदयाला हात घालणारा पुढील अनुभव आपल्या भाषणात जोशी सुरुवातीच्या दिवसांत खूपदा सांगत असत.

१९७८ साली पावसाळ्यात दिल्लीच्या भाजी मंडीत प्रथमच कांद्याचा भाव सव्वा रुपया किलो झाला. कांद्यावर लगेचच निर्यातबंदी घालण्यात आली. ताबडतोब चाकणच्या बाजारात कांद्याचा भाव क्विटलला १७ रुपयापर्यंत घसरला. त्यावेळी चाकणच्या बाजारात घडलेलं एक उदाहरण सांगतो.

एका शेतकऱ्याकडे चार गाड्या कांदा निघाला होता. आदल्या वर्षी त्याचं कांद्याचं पीक धुईमुळे संपूर्ण बुडालं होतं. पीक बुडाल्यामुळे त्याला बायकोला लुगडं घेता आलं नव्हतं. तो कांद्याच्या गाड्या घेऊन बाजाराला निघाला, तेव्हा बायकोनं सांगितलं, 'माझ्या लुगड्याच्या पार दशा झाल्या आहेत. तर येताना फार खर्चाचं नको, पण एक धडसं लुगडं आणा. आणि पोराची चड्डी फाटली आहे; त्याला मास्तर वर्गात बसू देत नाही, म्हणून घरी पळून येतो. त्याला एक चड्डी आणा.' शेतकऱ्याने चार बैलगाड्या भरून कांदा बाजारात नेला. पण १७ पैसे किलोने कांदा विकून झाल्यावर व मग कर्ज, हमाली, दलाली वगैरे देऊन झाल्यावर त्याच्या असं

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी११३