पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रास्ताविक


 शरद जोशी आणि त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ हा एक अभूतपूर्व झंझावात होता.
 १९८० सालच्या ऊस आंदोलनात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते, तर १९८६ सालच्या कापूस आंदोलनात विदर्भ व मराठवाड्यात मिळून ९०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते. लोकांचा इतका प्रचंड सहभाग लाभलेली चळवळ स्वातंत्र्योत्तर भारतात दुसरी कुठलीच झालेली नाही.
 असे असूनही ह्या झंझावाताची योग्य ती नोंद बुद्धिजीवींच्या वर्तुळात घेतली गेलेली नाही. जोशींचे समग्र असे जीवनचरित्रही उपलब्ध नाही. ती उणीव भरून काढण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे ही ह्या चरित्रामागची पहिली प्रेरणा आहे.
 त्याचबरोबर जोशींनी मांडणी केलेले अनेक प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत; मग तो प्रश्न शेतीच्या भवितव्याचा प्रश्न असो अथवा समाजातील वाढती विषमता अधोरेखित करणाऱ्या 'इंडिया' विरुद्ध 'भारत' या द्वंद्वाचा असो. जोशींचा वैचारिक वारसा आणि त्यांचा एकूणच जीवनसंघर्ष या प्रश्नांना सामोरे जाताना आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकेल व म्हणून तो वाचकांपुढे आणणे ही ह्या चरित्रलेखनामागची दुसरी प्रेरणा आहे.

 शरद जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांच्याशी माझा परिचय तसा उशिरा झाला. आयुष्यातील पहिली ४१ वर्षे माझे वास्तव्य मुंबईत झाले आणि आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नाडिस किंवा बाळासाहेब ठाकरे हे ज्या अर्थाने मुंबईकरांचे 'हिरो' बनले, त्या अर्थाने कधी मुंबईने जोशींची कदर केली नव्हती. जेव्हा माणूस साप्ताहिकामधून विजय परुळकरांची योद्धा शेतकरी ही मालिका प्रकाशित होत होती, तेव्हा ती आम्ही वाचत असू, नाही असे नाही; पण त्यापूर्वी काही वर्षे वि. ग. कानिटकर यांची नाझी भस्मासुराचा उदयास्त ही मालिका जेव्हा 'माणूस'मधून प्रकाशित होत होती, तेव्हा तिची आम्ही जशी विलक्षण आतुरतेने वाट बघायचो, तसे 'योद्धा शेतकरी'च्या बाबतीत होत नव्हते. जवळच्या जोशींपेक्षा दूरचा हिटलर शहरी मध्यमवर्गाला अधिक रोचक वाटत होता हे दुर्दैवी असले तरी सत्य होते. वृत्तपत्रे वाचून मनावर ठसणारी जोशींची अधीमुर्धी प्रतिमाही ते बड्या शेतकऱ्यांचे, म्हणजेच कुलक या वर्गाचे नेते आहेत अशी व म्हणून बहूंशी नकारात्मकच होती.

 पुढे पुण्यात आल्यावर आणि अंतर्नाद मासिक सुरू केल्यावर आमची पहिली भेट झाली व तेव्हाच ती प्रतिमा हळूहळू बदलू लागली. त्या भेटीचे कारण होते १९९९च्या अंतर्नाद दिवाळी अंकातील बस करा हे समाजसेवेचे ढोंग! हा त्यांचा प्रक्षोभक ठरलेला प्रदीर्घ लेख.

अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ◼ ११