पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(प्रपोगंडा) वाटला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे एक वर्ष शिकवत असताना सिडनममधले आपले सहाध्यायी आणि कोल्हापूरमधले आपले विद्यार्थी यांच्यातील फरकही त्यांनी बघितला होता. पण त्यावेळीही ते द्वंद्व त्यांच्या मनाला तितकेसे भिडले नव्हते; किंबहुना त्यांच्यात काही द्वंद्व आहे हे बुद्धीला तितकेसे पटलेही नव्हते.
 याचे कारण त्यावेळी ते स्वतः त्या 'इंडिया'चाच एक भाग होते आणि जे मत आपल्याला फायदेशीर आहे, तेच मत आपोआपच मनोमन ग्राह्य मानणे आणि जे मत आपल्या हितसंबंधांना बाधा आणणारे आहे, ते दुर्लक्षित करणे हे एकूणच मनुष्यस्वभावाला धरून होते.
 पण आताची परिस्थिती अगदी वेगळी होती. स्वतःच घेतलेल्या निर्णयामुळे ते पूर्वीच्या सुखासीन अशा 'इंडिया'तून दरिद्री 'भारता'त फेकले गेले होते. आपल्या आताच्या दुःखाला दुसरा कोणीतरी 'शोषक' इंडिया जबाबदार आहे, ही जाणीव त्यांच्या हृदयात काट्याप्रमाणे सलत होती. शहरात आहे तो 'त्यांचा इंडिया' आणि गावात आहे तो 'आपला भारत'.
 देशातील एकूण गरिबीचे मूळ शेतकऱ्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावातच आहे हेही उघडच होते. शहरात झोपड्यांमधून राहणारे ते दुर्दैवी जीव – किंवा त्यांचे पूर्वज - हेही एकेकाळी आपल्यासारखेच शेतकरी असले पाहिजेत आणि शेतीत होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना शहरात स्थलांतर करावे लागले असले पाहिजे हेही स्पष्टच होते.
 'इंडिया विरुद्ध भारत' या त्यांच्या मनात घोळू लागलेल्या द्वंद्वाला आणखीही एक महत्त्वाचा व्यक्तिगत पदर असणे शक्य होते. गेल्या दीड वर्षात पदोपदी त्यांना अगदी किरकोळ लोकांपुढे बाबापुता करावे लागले होते, अगदी क्षुल्लक कारणासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले होते, समोरच्या माणसाशी अजिजीने बोलावे लागले होते. घर घेणे, जमीन घेणे, त्यासाठी लागणारे असंख्य कागदपत्र मिळवणे, गॅस-टेलिफोनचे कनेक्शन मिळवणे, विजेचे मीटर स्वतःच्या नावावर करून घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश मिळवणे, त्यासाठी तहेत-हेचे दाखले मिळवणे - एक ना दोन, अशा असंख्य प्रसंगी गेल्या दीड वर्षांत त्यांच्या वाट्याला असे अपमान आले होते. आपल्या शेतातले कांदे, बटाटे, काकड्या विकण्यासाठी जेव्हा ते चाकणच्या बाजारसमितीत जात होते, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांच्याकडून, व्यापाऱ्यांकडून, अगदी हमालांकडूनही त्यांच्या आत्मसन्मानाला प्रत्येक वेळी अशीच ठेच पोचत होती. आपल्या मालाची किंमत किंवा आपल्या श्रमाचे मूल्य हा समोरचा फालतू माणूस ठरवणार आणि ते मुकाटपणे मान्य केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, ही जाणीव त्यांचे विलक्षण संवेदनशील मन पोळणारी होती.
 त्यांच्यासारख्या उच्च शासकीय सेवेत दहा वर्षे काढलेल्या व्यक्तीला ह्यातला प्रत्येक प्रसंग अगदी जिवावर धोंडा ठेवून निभवावा लागला होता. आत्मसन्मानाची अतिशय प्रखर जाणीव असलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या दृष्टीनेतर यांतल्या प्रत्येक प्रसंगाची दाहकता अधिकच असह्य होती.

 'इंडिया विरुद्ध भारत' या संकल्पनेत त्यांना उमगलेले तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब तर होतेच, पण त्यांच्या स्वतःच्या तत्कालीन मानसिक संघर्षाचे प्रतिबिंबही त्या

मातीत पाय रोवताना१०९