पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ठाऊक असले, तरी विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे, त्यांचा छळ करणे, विशेषतः सक्तीची नसबंदी वगैरेबाबत लोकांत खूप असंतोष आहे हे त्यांनी हेरले होते. इंदिराजी हरल्या ह्याचा त्यांनाही इतरांप्रमाणेच आनंद झाला होता. त्या आधीच्या १८ महिन्यांत आणीबाणीमुळे राजकीय मंचावर सारे कसे शांत शांत होते. आता एकदम सगळीकडे राजकारणाची चर्चा सुरू झाली. लोक जणू आपल्या दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते.
 त्यानंतर पुढल्याच वर्षी, मार्च १९७८मध्ये, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर झाले. मामा खेड मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढवणार व जिंकणार ह्याविषयी सगळ्या चाकणची खात्री होती. पण अचानक कुठेतरी चावी फिरली आणि जनता पक्षाने मामा शिंदे यांना तिकीट नाकारले. त्यांना मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शेवटी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचे ठरवले. त्यांचे चिन्ह होते सायकल.
 आपल्या लढतीची पूर्वतयारी साधारण ७८च्या जानेवारी महिन्यातच मामांनी सुरू केली व त्याचवेळी जोशी आपण होऊन त्यांना म्हणाले, "मामा, ह्या संपूर्ण प्रचारात मी माझ्या डिझेल भरलेल्या जीप गाडीसह तुमच्या सेवेला हजर राहीन. तुम्ही जिथे जिथे जाल, तिथे तिथे मी तुमच्याबरोबर येईन." मामांना ह्या अनपेक्षित ऑफरचे खूप अप्रूप वाटले. गाडी, डिझेल आणि ड्रायव्हर ह्या सगळ्याचीच एकदम सोय झाली होती! शिवाय त्या काळात जोशींच्या भोवतीचे आयएएसचे व स्वित्झर्लंडचे वलय कायम होते. गावात कुठेही गेले तरी ते आपली छाप हमखास पाडत. अशी व्यक्ती दिमतीला असणे ही मामांच्या दृष्टीने मोठीच जमेची बाजू होती.
 जोशी म्हणतात,
 "मामांच्या निवडणूक प्रचाराच्या काळात मी रोज माझी मोडकीतोडकी जीप गाडी घेऊन, त्यात डिझेल भरून, मामांच्या घरासमोर उभा राहत असे. आमची निघण्याची वेळ अगदी पक्की ठरलेली असे. ते निवडून आले, तर त्यांच्या मतदारसंघात काय काय करता येईल याची आखणी आम्ही प्रवासात करत असू."
 अपक्ष असूनही मामांनी चांगलीच लढत दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात 'ही सायकल कोणाची, गरीब आपल्या मामांची' ही घोषणा दुमदुमत होती. ते निवडून येतील असे जोशींसकट सगळ्यांनाच वाटले होते, पण प्रत्यक्षात त्यांना सुमारे १२.००० मते पडली व आणीबाणीची पार्श्वभूमी असतानाही त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे २३,००० मते मिळवून काँग्रेसचे राम जनार्दन कांडगे निवडून आले. तसे व्यक्तिशः तेही मामांना गुरुस्थानी मानत. लोकभावना ओळखण्यात आपण कसे चुकतो व प्रत्यक्षात निवडणुकांची गणिते किती वेगळी असतात याची जोशींना ह्या काळात थोडीफार जाणीव झाली.

 अर्थात, जोशींच्या दृष्टीने निवडणुकीतील हारजीत तशी कमी महत्वाची होती. मामांच्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन काहीतरी साधायचे त्यांचे उद्दिष्ट होते. किंबहुना ते उद्दिष्ट समोर

मातीत पाय रोवताना१०३