पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३)

लाभतो. मेहेरजानवरील प्रीती आणि राज्यतृष्णा याच्यापैकी रामराजाने राज्य' निवडले आणि मेहेरजानची प्रीती दूर सारली. त्यामुळे त्याच्या वाट्याला काय आले ते केवळ दुःख! राम राजा मनाशी म्हणतो- आपण जे काय दूर सारले तेच खरे सुख, महत्वाकांक्षेने ज्याच्या मागे लागलो ते सुख नव्हे, तसे पाहिले तर सर्व माणसाला सुख हवे असते, पण कधी कधी ज्याच्यावर निस्सीम प्रेम केले तेच दुःख भोगाला कारण होते, तर कधी कधी दोन मूल्यांच्या संघर्षांत एकाची निवड केली ती निवडच दुःख भोगाला कारण ठरते, तर कधी नियतीच्या लहरीमळे दुःख भोगावे लागते. माणूस मुळातच दुःखचक्रांत गवसलेला आहे आणि अशा माणसाचा शोध घेण्यात हरिभाऊ विलक्षण रंगतात असे त्यांच्या सामाजिक वा ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना जाणवते हरिभाऊंच्या कादंबरी लेखनात विस्कळितपणा, पाल्हाळिकता, बंदिस्त रचनेचा अभाव इत्यादी दोष असले तर त्यांचे जीवनविषयक आकलन अत्यंत सूक्ष्म, सखोल आहे.

 हरिभाऊंची कादंबरी जशी वेधक आहे तशी त्यांची स्फुट गोष्टही चित्ताचा ठाव घेते. हरिभाऊंच्या 'स्फुट गोष्टी'तही पांढरपेशा मध्यमवर्गाच्या सुखदुःखाचे, प्रश्नांचे, त्यांच्या आशा-आकांक्षांचे चित्रण आहे. या वर्गाच्या माजघरात, स्वयंपाक घरात, दिवाणखान्यात जे घडते त्याचे चित्र आढळते. पतिपत्नी, पितापुत्र, सासू-सून बहीणभाऊ, शेजारीपाजारी यांच्या दरम्यान जे नाते आहे. जे संबंध आहेत त्यावर प्रकाश टाकणारी त्यांची स्फुट गोष्ट आहे. 'थोड्या चुकीचा घोर परिणाम' या दिर्घकथेत ते दारुच्या व्यसनाचे दुष्परिणाम रंगवतात. तर 'काळ तर मोठा कठीण आला' या दीर्घकथेत दुष्काळाचे चित्रण आहे. ही कथा Story of Ramji या नावाने ओळखली जाते. आणि ती पहिली रूपांतरित कथा आहे. पाडव्याला भेट, दुर्गाताईची ओवाळणी, पुरी हौस फिटली (नेकलेस या मोपासाच्या कथेचं रुपांतर), इ. वाचल्यातरी हरिभाऊंच्या निवेदन शक्तीचा प्रत्यय येतो. हरिभाऊंच्या स्फुट गोष्टीला स्वतःचे असे रुप होते बोधपर आणि करमणूक करणाऱ्या स्फुटगोष्टी प्रामख्याने कुटुंबाचे चित्र रेखाटणाऱ्या आहेत. हरिभाऊंच्या 'स्फुटगोष्टी' पासून प्रेरणा घेऊन अनेक नव कथालेखकांनी करमणूकीतून स्फुटगोष्टी लिहिल्या आणि हळूहळू स्फुटगोष्टीचा नवा वाचकवर्ग निर्माण झाला करमणूकीतील 'स्फुटगोष्ट' मनोरंजनात संपूर्ण गोष्ट झाली आणि वि. सी. गुजरांचे गोष्टीयुग सुरु झाले.

 करमणूकीत कवितेला तसे गौण स्थान होते. कविवर्य केशवसुत, बी. गोविंदाग्रज इत्यादींच्या कविता करमणुकीतून आल्या. कवितेप्रमाणे छोटे लेख, शास्त्रीयलेख, छोटी चरित्रे, नाटिका, चटके असे कितीतरी विविध प्रकारचे लेखन प्रसिद्ध झाले 'करमणूक' या अग्रेसर नियकालिकाच्या वाङ्म़याचा अभ्यास ही छोटी पुस्तिका लिहन डॉ गिरधारी यांनी पहिले पाऊल टाकले आहे, याच प्रकारे करमणूक कालखंडातील नियतकालिकांचा वाङ्म़यीन अभ्यास करण्याचे कार्य डॉ. गिरधारी यांनी हाती घ्यावे.

- भालचंद्र फडके

यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
८ ऑगस्ट १९९१