पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रस्तावना -

 एकोणिसावे शतक म्हणजे आज विकासात झालेल्या कथा, कादंबरी; काव्य, नाटकादि वाङ्म़य प्रकारांची गंगोत्री! आजची नवकथा, स्फुट गोष्ट, संपूर्ण गोष्ट लघुकथा असा प्रवास करीत विकसित झाली आहे. तशीच आजची कादंबरी हे हरि नारायणांच्या कादंबरीचे विकसित रूप होय, हरिभाऊंची स्फुट गोष्ट अवतरली ती करमणुकीच्या पानांत मिळालेल्या थोड्या जागेत तर हरिभाऊंच्या प्रकरणशः येणाऱ्या कादंबरीने करमणुकीची अर्ध्याहून अधिक पाने व्यापली आहेत. एका अर्थाने मराठी वाङ्म़यातील जवळ जवळ सर्व वाङ्म़य प्रकार करमणूकीने जोपासले आहेत. १८९० ते १९२० असा जवळ जवळ तीस वर्षांचा कालखंड 'करमणूक कालखंड' म्हणून संबोधता येईल.

 अशा एका महनीय नियतकालिकाचा वाङ्म़यीन अभ्यास आमचे मित्र प्रा. डॉ. भास्कर गिरधारी यांनी अगत्यपूर्वक केला आहे. हा अभ्यास प्राधान्याने परिचयात्मक आहे. वाङ्म़यीन नियतकालिकांचा अभ्यास करावा आणि साहित्य प्रकाराच्या विकासाला आणि विस्ताराला या नियतकालिकांनी कोणते योगदान दिले त्याचा चिकित्सक अभ्यास करण्याची कल्पना मराठवाडा विद्यापीठात असताना गुरुवर्य प्रा. वा. ल. कुळकर्णी यांनी मांडली. आणि 'ज्ञान प्रसारक' या पहिल्या वाङ्म़यीन नियतकालिकाची कामगिरी त्यांनी विशद केली. त्यानंतर विविध ज्ञान विस्ताराने साहित्य विचारात कोणती भर टाकली त्याचा शोध घेतला. वाङ्म़यीन नियतकालिकांचा चिकित्सक अभ्यास मराठी वाङ्म़याचा इतिहास सिद्ध करण्यासाठी साधनभूत ठरतो. म्हणून तर वाङ्म़यीन नियतकालिकांचे चिकित्सक अभ्यास संशोधकाने परिश्रमपूर्वक केले पाहिजेत.

 करमणूकचा मासला वा नमुना अंक २५ ऑक्टोबर १८९० रोजी निघाला. आणि २२ डिसेंबर १९१७ पर्यंत म्हणजे एकूण २७ वर्षे अव्याहतपणे चालू होते. गुरूवर्य प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचे पत्र घेऊन मी आर्यभुषण छापखान्यात गेलो आणि 'करमणूक' साप्ताहिकाचे सर्व बांधीव अंक अभ्यासता आले. मराठी कथा वाटचाल या प्रबंधासाठी करमणुकीतील कथालेखन हे प्रकरण लिहिले. या प्रकरणाच्या आधारे लिहिलेला माझा निबंध सत्यकथेत प्रसिद्ध झाला होता. पुढे डॉ. श्रीमती सुधा कापरे यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली करमणुकीचा सर्वांगीण अभ्यास केला आणि त्यांचा प्रबंध पी.एच.डी. पदवीसाठी मान्य झाला. त्यांच्या प्रबंधात करमणुकीच्या २७ वर्षांच्या अंकांची एक सविस्तर सूचीही आहे. म्हणन प्रा. गिरधारी जेव्हा लिहितात की, करमणुकीचे अंक सुस्थितीत मिळणे दुरापास्त आहे. (पा. ७) तेव्हा त्यांनी आर्यभूषण छापखान्यातील अंक पाहिले नसण्याची शक्यता आहे. अभ्यास साधने यात मराठी कथेची वाटचाल आणि डॉ. श्रीमती कापरे यांचा उल्लेख आढळत नाही. हे दोन्ही अप्रकाशित प्रबंध जयकर ग्रंथालयात उपलब्ध होऊ शकले असते.

 १ नोव्हेंबर १८९० च्या अंकात करमणूक पत्र आपण का काढले त्याचे विवेचन हरिभाऊंनी विस्ताराने दिले आहे. "केसरी सुधारकादी पत्रे आपल्या कुशल