पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
 

केशवसुतांनी खेडहून १९-११-९० ला लिहिल्याची करमणूकीत नोंद आहे. तर 'पुष्पाप्रत' २६ मार्च, १८९२ ला प्रसिद्ध झालेली आहे. तर रात्रीस ओरडणाऱ्या 'घुबडास' ही गोविंदाग्रजांची कविता (दि.२५ ऑ.१९०६ ला प्रसिद्ध झाली.) मराठी कवितेच्या इतिहासात १८७४ ते १९२० हा कालखंड कवितेच्या क्षेत्रातील परंपरा आणि नवता यांच्यातील संघर्षांचा कालखंड मानला जातो. याचा अर्थ या कालखंडाचे मोल विशेष आहे. तत्कालीन काव्यशास्त्र नियमांच्या कचाट्यातून कविता मोकळी झाली ती व्यक्तिवादाच्या उदयामुळेच. व्यक्तिमत्त्वाच्या मुक्त विकासाची जाणीव काव्याला नवे वळण देण्यास कारणीभूत ठरली.

 भावगीतात्मक जाणीव, आत्मलेखन, विशेषत: प्रेमविषयक प्रणयप्रधान, निसर्ग प्रेम, सामाजिक विचार, गूढगुंजन, सुनीतादी नव्या काव्य प्रकारांचा पुरस्कार, इत्यादी गोष्टी केशवसुतांनी मराठीत आणल्या.

(म. वा. इतिहास, खंड ५ वा. पान १८३)

 प्रि. वा. शि. आपटे यांनी करमणूकवर दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे की, 'कविता थोड्या थोड्या दर अंकात येतात, पैकी काही फारच मनोहर, उदात्त, रसपूर्ण व वास्तविक कवित्व शक्तीदर्शक आहेत. म्हणून त्या लोकादरास पात्र ठरतात असे म्हटले आहे.'

(करमणूक : २४ ऑक्टो. १८९१)

करमणुकीतील कथा-

 काही लोककथा, लीलाचरित्र, दृष्टान्तपाठ यातील काही चुटकेवजा बोधकथा, यातून मराठी कथा अगदी क्षीण प्रवाहात अवतरली. पंचोपाख्यान ग्रंथातील भाषांतरित कथा तर कधी ऐतिहासिक बखरीतील छोट्या मोठ्या कथा प्रसंग वर्णनातून हा प्रवाह किंचित जोर धरु पाहत होता. पण खऱ्या अर्थाने हरिभाऊंच्या स्फुट गोष्टींच्या रुपाने हा प्रवाह नवे वळण घेऊन प्रभावीपणे प्रकट झाला. प्राचीन कथेतील नैतिक बोध आणि रंजकता यांचे हरिभाऊंच्या स्फुट गोष्टींचे नाते आहे. हरिभाऊंनी नीतीपात आणि शिक्षण देणाऱ्या सिंहासन बत्तीशी, पंचतंत्र, हितोपदेश, राजा प्रतापादित्याचे चरित्र या कथांपेक्षा आपल्या स्फुट गोष्टींना सामाजिकतेची भक्कम बैठक दिली. करमणुकीत १८९० नंतर हरिभाऊंनी लिहिलेल्या स्फुट गोष्टी ही आधुनिक मराठी कथेची सुरवात आहे. कथा आणि कादंबरी यातील नेमका फरक कोणता हे ज्या काळात पुरेसे स्पष्ट झालेले नव्हते. त्या काळात एका कलावंत मनाने केलेली ही निर्मिती आहे. काहिशी पाल्हाळिक गोष्टी वेल्हाळ म्हणता येईल अशीच ही गोष्ट आहे, पण तिची रचना मात्र कथेसारखी केली आहे. एका प्रगल्भ सामाजिक जाणिवेतून तिचा जन्म झाला. हरिभाऊंची करमणूकीतून साकार झालेली कथा पहिली म्हणून विशेष महत्त्वाची ठरते. कारण क्वचित् आधुनिक कथेत शोभेल असा प्रारंभ,