पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
 

विशेष लक्षात घेतले पाहिजे. हरिभाऊ बोधवादी होते, त्यावरून कादंबरीला बोधवादाच्या मर्यादा पडल्या किंवा कलात्मकता दुणावली असे ढोबळ अनुमान काढून चालणार नाही. महत्त्वाचे म्हणजे हरिभाऊ वास्तववादी कादंबरीकार होते. त्यांच्या या वास्तववादाचा विकास प्रा. नरहर कुरुंदकरांनी नमूद केल्याप्रमाणे वामन मल्हारात झालेला दिसतो आपल्या कादंबरीचा आढावा घेणाऱ्या 'धार आणि काठ' ग्रंथात ते नमूद करतात-

 'वाङ्म़यीन गुणवत्तेच्या दृष्टीने हरिभाऊंच्या मागे दुवा सांधण्यासाठी असे फारसे नाहीच. त्या दृष्टीने हरिभाऊंचा उदय मराठी कादंबरी विश्वात अकल्पित व स्वयंभूच मानला पाहिजे. (पान ४४)

  या कादंबऱ्यांची हरिभाऊंची लेखनशैली अत्यंत साधी सुबोध, प्रवाही, बालबोध व पारदर्शक आहे त्यात व्यक्तींना जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे. सर्व बारकावे सांगणारी हरिभाऊंची शैली व्यक्तींच्या चेहरेपट्टीपेक्षा व्यक्तिमत्त्व आणि मन साकार करते प्रसंग चित्रणाचे सामर्थ्य तिच्यात आहे. जीवनाचा सूक्ष्म तपशील टिपणारी ही नवी शैली होती. पत्र या शैलीत गतीचा कमाल संथपणा आणि पाल्हाळ हे दोष जाणवतात. व्यक्ती आणि प्रसंग यशस्वीपणे साऱ्या तपशीलासह हरिभाऊ यामुळेच उभा करू शकले. सर्वसामान्य वास्तवाचे स्वाभाविक आणि जिवंत वर्णन करण्यासाठी समर्थ असणारी ही अलौकिक शैली म्हणावी लागेल. स्त्री पुरुषांची सुखदुःखे या शैलीने खऱ्या अर्थाने जिवंतपणे चित्रित केली; याचे सारे श्रेय हरिभाऊंच्या कडे जाते. पण त्यामुळे या शैलीत संयम आणि सुचकतेचा अभाव जाणवतो. तथापि हरिभाऊंच्या उज्ज्वळ आणि अस्सल प्रतिमेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वास्तवाशी राखलेले इमान आणि त्यांची जिवंत प्रत्ययकारिकता होय.

 सुधारक, हरिभाऊ आगरकरांपेक्षा गोखलेंच्या उदारमतवादाने भारलेले होते. त्यांनी मराठी कादंबरीला बोधवादाच्या कुंपणावरून कलात्मकतेच्या प्रांतात उडी मारायला लावली. या दृष्टीने हरिभाऊंची सामाजिक कादंबरी मराठीत प्रथमच जिवंत माणसांच्या जीवनाविषयी प्रामाणिक कुतूहल निर्माण करू शकली हे लक्षात येते आपल्या कादंबऱ्यातून त्यांनी मानवी मनाचे विविध नमूने पेश केले. मराठी कादंबरीने प्रथमच माणसाकडे माणूस म्हणून पाहिले ते हरिभाऊंच्या कादंबरी लेखनातूनच.

 स्वत:च्या कुचंबणेची जाण नाही आणि आपल्या विकासाला प्रतिकूलता आहे अशा दोन्ही प्रकारच्या मागास समाजातील दुहेरी कुचंबणेचे चिंतन यशस्वीपणे हरिभाऊंनी आपल्या कादंबऱ्यातून केले आहे. तात्पर्य हरिभाऊंच्या कादंबरीत सुधारक