पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
१९
 

लेखन करावे असे ठरविले होते. 'आजकालच्या गोष्टींचा कर्ता' असे अगदी सुबोध नाव आपल्या ग्रंथ कर्तुत्वाची ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी स्वीकारले होते.

 त्यांच्या 'मधली स्थिती' कादंबरीची आणि 'आनंदाश्रमाची जडणघडण एकाचवेळी झाली. त्या वास्तवचित्रणाने हुबेहुब नक्कल वास्तवाची रेखाटली गेली. वर म्हटल्याप्रमाणे समाजाचे जिवंत चित्रण करून समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठीच जणु हरिभाऊंचा अवतार झाला होता, असा विचार ह. मो. महाजनी यांनी बोलूनही दाखविला होता.

 'करमणूक' ला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा संपादकांनी संपूर्ण वर्षाकडे मागे वळून पाहून प्रामाणिकपणे आपल्या काही त्रुटींची कबुली दिली आहे. त्यात कादंबरीच्या पाल्हाळाची व लांबलेल्या स्वरूपाची कल्पना यावी असा उल्लेख आहे.

  'पण लक्षात कोण घेतो' कादंबरीच्या संदर्भात ते लिहितात 'पण लक्षात.' ही आत्मवृत्त कथनपर कादंबरी अपुरी राहिली, याचे कारण एवढेच की ती 'आजकालच्या गोष्टी' नावाच्या कथावलीपैकीच एक कथा असून फार मोठी आहे. प्रथम कादंबऱ्या देण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही एक वर्षात संपतील अशी उमेद होती. परंतु तसे होईल असे दिसेना, तेव्हा दोन्ही गोष्टी सारख्या चालू ठेवून अपुऱ्या ठेवण्यापेक्षा त्यातल्या त्यात लहान असेल ती एक पुरी करावी व दुसरी पुढील सालाकरीता राखून ठेवावी असा विचार केला. पुढे पुष्कळ वाचकांच्या आग्रहास्तव बारीक टाइपास फाटा द्यावा लागला, त्यामुळे वरील विचारच कायम करावा लागला. तथापि यंदा तसे न करता मजकूर जितका जास्त घालता येईल तितका घालून वरील गोष्ट पुरी केली जाईल. या गोष्टींमध्ये विशेष काय आहे हे आलेल्या प्रकरणांवरून वाचकांच्या लक्षात येईलच. नव्या वर्षात मात्र " मुख्य कादंबरी, पण लक्षात कोण घेतो' हीच पुरी केली जाईल." असे स्पष्ट केले आहे.

(करमणूक, १७ ऑक्टोबर, १८९१)

 'गणपतराव', 'मधली स्थिती', 'आजच' आणि 'कर्मयोग' वजा जाता सर्व कादंबऱ्या हरिभाऊंनी करमणुकीतून प्रसिद्ध केल्या म्हणजे त्यांच्या कादंबरीने करमणुकीतून मराठी कादंबरीत हरिभाऊंचे नवे युग निर्माण केले, म्हणून त्याचा विस्ताराने परामर्ष घेणे येथे गरजेचे आहे.

  हरिभाऊंच्या कादंबरी लेखनापर्यंत मराठी मध्ये 'मुक्तामाला', 'राजा मदन' सारख्या अद्भ़ुतरम्य कादंबऱ्या हळबे, रिसबुडांसारख्या विशेष कादंबरीकारांच्या विशेष लोकप्रिय होत्या. प्रत्यक्ष हरिभाऊंच्या कादंबरीच्या परिशीलनातून त्यांच्या कादंबरीचे