पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 

हरिभाऊंनी पुन्हा दिनांक १ नोव्हेंबर, १८९० च्या वर्ष १ ले अंक २ मध्ये छापला आहे. त्यात ते म्हणतात...

 "करमणूक पत्र काढण्याचा उद्देश एवढाच की मराठी भाषा जाणणाऱ्या साधारण जनसमूहाचे मनोरंजन करून त्यांस व्यावहारिक, शास्त्रीय, इत्यादि अनेक गोष्टींचे" ज्ञान करून द्यावयाचे. केसरी, सुधारकादि पत्रे आपल्या कुशल लेखणीने जे काम निबंधाच्याद्वारे करितात तेच काम हे पत्र मनाची करमणूक करून करणार. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स इत्यादि देशांतील अर्वाचीन ग्रांथिक इतिहासाकडे पाहिले असता दोन प्रवृत्ती विशेष लक्षात येतात. एक प्रचंड ग्रंथाचे सार काढून देणे, व दुसरी अनेकविध शास्त्र मीमांसाची तत्त्वे, मनाचे रंजन होऊन कळतील अशातऱ्हने सांगणे. देशांत सुधारणा व्हावी याकरिता केसरी सुधारणादिपत्रे पहिल्या प्रवृत्तीचे अवलंबन करून चालली आहेत. हे पत्र दुसऱ्या प्रवृत्तीच्या अवलंबनाने चालणार. जी गोष्ट जनसमूहाने अवश्य करावी म्हणून केसरी, सुधारक एखाद्या कठोर पित्याप्रमाणे कठोर शब्दाने सांगणार व समाजाचे अप्रशस्त वर्तन झाल्यास वेळी वागप्रतोदाचे तडाखे लगावणार, तीच गोष्ट हे पत्र प्रेमळ मातेप्रमाणे गोड गोड शब्दांनी व चांगल्या चांगल्या गोष्टींनी अप्रशस्त वर्तनाबद्दल मायेचे शासन करणार. एवढे मात्र ध्यानात ठेवावे, की हे पत्र आचरट आईप्रमाणे फाजील लाड करणार नाही. या पत्रांत आता आपणास हवा तसा आचरट व पाचकळ मजकूर वाचावयास सापडेल अशी आशा धरून जे याचे वर्गणीदार होतील त्यांची अत्यंत निराशा होईल. नाटिका, फटिका अशी मोठमोठी नांवे घेऊन पाचकळ व फाजील मजकूर खरडण्यासाठी हे पत्र नव्हे. ज्यांस तशा मजकूराखेरीज काही एक आवडत नसेल त्यांनी आमचेकडे आपली वर्गणी पाठवून आमचे हात विटाळू नयेत. परंतु ज्यांस पुढच्या माडीपासून चुलीपर्यंत व दिवाणखान्यांतील टेबलापासून फणी-करंड्याच्या पेटीपर्यंत कोणाच्या हाती पडले तरी हवे त्याने हवे त्याच्या देखत निःशंकपणाने वाचण्यास हरकत नाही. असे पत्र पाहिजे असेल त्यांनी अवश्य करमणूकीचे वर्गणीदार व्हावे. ज्यांस पाश्चिमात्य व पौर्वात्य नाटक कादंबऱ्यादि ग्रंथातील अत्यंत निर्मल, सरस व उत्कृष्ट अशा ग्रंथांचा भाषांतरद्वारा रसास्वाद घेण्याची इच्छा असेल त्यानी अवश्य आम्हांस आश्रय द्यावा. सध्याच्या आजच्या बऱ्यावाईट स्थितीचे कोणीही वाचले असतां बिलकूल नाक मुरडण्याचे कारण नाही, असे चित्र पाहिजे असेल त्या गृहस्थास आम्ही आदरपूर्वक निमंत्रण करतो. शनिवारी संध्याकाळी थकून भागून आल्यावर आपले कुटुंबातील लहान मोठ्या माणसांस जमवून खुशाल हसत खेळत करमणूक करून ज्ञान मिळविण्याची ज्यांस इच्छा असेल त्यांचे आम्ही नम्र सेवक आहोत. शुद्धतऱ्हेने सहकुटुंब सहपरिवार करमणूक करून घेऊ