पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास

- डॉ. भा. व्यं. गिरधारी



प्रास्ताविक -

 मराठी नियतकालिकाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तरी 'करमणूक' नियतकालिकाचे वेगळेपण ठळकपणे आपल्या नजरेत भरते, ही वस्तुस्थिती आहे. अगदी नावापासून विचार केला तरी निर्भेळ शुद्ध करमणूक करण्याचे उद्दिष्ट बाळगून मराठीतील सुप्रसिध्द कादंबरीकार, कथाकार, समाजसुधारक हरि नारायण आपटे यांनी परिश्रमपूर्वक या साप्ताहिकाचा सारा भार समर्थपणे पेलला, असे म्हणता येईल.

 'केसरी', 'सुधारक', 'निबंधमाला', 'ज्ञान प्रसारक', 'शाळापत्रक', 'विविध ज्ञान विस्तार', 'मनोरंजन', 'निबंध चंद्रिका', ' सचित्र करमणूक' इत्यादी नियतकालिकांच्या फेऱ्यात निव्वळ मनोरंजन आणि करमणूकीला बांधलेले एक नियतकालिक म्हणून 'करमणूक' आपल्या आगळेपणाने लक्ष वेधून घेते. करमणूकीबरोबरच 'ज्ञान' महत्त्वाचे मानले असल्यामुळे, एकाचवेळी मनोरंजन आणि उपयुक्त ज्ञान वाचकांना पेलवेल अशा तऱ्हने मांडणारे हे नियतकालिक होते, तोच तो पणाचा आणि रूक्ष नीरस तत्त्वज्ञानाचाही शेवटी सामान्य वाचकाला कंटाळा येतोच. राजकारणाचाही प्रसंगविशेषी वीट येतो. या पार्श्वभूमीवर ही शनिवारची करमणूक मौजेची व एक विरंगुळा म्हणून साहित्य रसिकांना आवडली. तत्कालीन वाचकांची गरज कमालीच्या अचूकपणे हेरण्यात संपादकाचे विशेष कौशल्य व वाङ्म़यीन जाण आपल्या दृष्टोपत्तीस येते. महत्वाचे म्हणजे सतत वाचकांच्या नाडीवर आपला एक हात ठेवून त्याची अभिरुची, आवड, निवड लक्षात घेऊन हरिभाऊंनी पुढील संपादन कार्यही अव्याहतपणे चालू ठेवले. नियतकालिकांच्या मालिकेत त्यामुळेच करमणूक साप्ताहिकाला एक वेगळे नियतकालिक म्हणून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. हरिभाऊंच्या कादंबऱ्या मालेच्या रुपाने सादर करणारे,भरपूर रंजनाचा व उपयुक्त ज्ञानाचा मालमसाला ठासून भरलेले, भाषाशैलीच्या दृष्टीने मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजाचे एक नियतकालिक म्हणून 'करमणूक'. साप्ताहिकाने जनमानसात आपले स्थान सिद्ध केले आणि त्याचा खपही सतत वाढता राहिला.