पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशी खात्री असताना काँग्रेसच्या घाबरगुंडीच्या भूमिकेने किंवा सुभाषचंद्र बोसांच्या धास्तीने विचलित होण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. काँग्रेसचे आंदोलनही हाताबाहेर जाण्याइतके प्रभावी होणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. मुसलमान, दलित आणि नोकरदार यांच्या पाठिंब्याची त्यांना खात्री होती त्यामुळे गोवालिया टॅंकचा ठराव होताच त्यांनी अटकसत्र सुरू केले. मग सगळा इतिहास घडला आणि त्यांनतर साधारणपणे वर्षभरात सारे काही शांत शांत झाले होते.
 जबाबदारी कोणाची?
 बेचाळीसच्या आंदोलनातील घातपाती कृत्यांची नैतिक जबाबदारी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आहे, अशी भूमिका इंग्रज सरकारने घेतली. याउलट, "नाही हो! आम्ही असे काही म्हटलेच नव्हते." असा विश्वामित्री पवित्रा काँग्रेस आणि गांधींनी घेतला. ठराव अहिंसात्मक आंदोलनाचा असला तरी काँग्रेसी नेत्यांची एकूण चालचलणूक अशी होती, की ज्यामुळे लोकांना टोकापर्यंत जाऊन वाटेल ते करण्याचा आदेश मिळाला, असा सरकारी युक्तिवाद होता.
 इंग्रज सरकारच्या या आरोपाच्या काँग्रेसने स्पष्टपणे इन्कार केला. आमचे आंदोलन शांततामय झाले असते. सरकारने धरपकडीस सुरुवात केली ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. खरे म्हणजे सरकार आणि काँग्रेस यांच्या भूमिकेत फार मोठी तफावत होती अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि त्यात सत्याचा मोठा भाग असावा.
 घातपातात आक्षेपार्ह काय?
 एक मोठी गमतीदार गोष्ट घडली. आंध्र प्रदेश काँग्रेसने काढलेले एक परिपत्रक सरकारने प्रसिद्ध केले. त्यात सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचा भाग म्हणून करायच्या कार्यक्रमांची यादी दिली होती. टेलिफोन आणि तारा तोडणे, रेल्वेचे रुळ उखडणे, पूल तोडणे, आगगाडीत धोक्याच्या साखळ्या ओढणे, पोलिस व इतर सरकारी नोकरांस राजीनामे देण्यास भाग पाडणे, हरताळ, दारू दुकानबंदी, युद्धकार्यास अडथळे इ. इ. पत्रकावरून घातपातप्रकारांत काँग्रेसचा अधिकृत भाग होता हे स्पष्ट होते असा सरकारचा आरोप. गांधीजींनी या आरोपाला दिलेले उत्तर मोठे मासलेवाईक आहे. ते म्हणाले,

 "या विषयावर मी काहीच बोलू नये, कारण मला अटक होण्यापूर्वी या परिपत्रकाची काही माहिती नव्हती. म्हणून या विषयावर मी हातचे राखून बोलत आहे. एवढी प्रस्तावना केल्यानंतर मला असे वाटते, की एकूण पाहता

भारतासाठी । ९९