पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पंडित नेहरूंनी ठराव मांडला; सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यांच्या भाषणात व्यापक आंदोलनाचा उल्लेखही नव्हता. ठराव मंजूर झाला आणि मग गांधीजी बोलण्यास उठले. दोस्त राष्ट्रांना काँग्रेसने दिलेली ही अपूर्व संधी आहे. यापुढे प्रत्येक भारतीयाने आपणास स्वतंत्र मानावे आणि स्वतंत्र माणूस म्हणून जगावे. हा गांधीजीचा संदेश. लोकांना करा किंवा मरा असा आदेश गांधीजींनी दिल्याचे दिसत नाही. त्यांनी वापरलेले वाक्य असे, "मी काँग्रेसला शपथ दिली आहे आणि काँग्रेस करेल किंवा मरेल."
 आदेश आणि अंमलबजावणी
 "हे एक जनआंदोलन असेल; आमच्या योजनांत गुप्त असे काही नाही; ही खुली लढाई आहे. आम्ही एका साम्राज्याशी टक्कर घेत आहोत आणि हा खुला सामना आहे. या विषयावर काही गैरसमज नको; गोंधळ नको. आंदोलनात कोणताही गुप्त कार्यक्रम नसेल. जे भूमिगत कार्यक्रम करतील ते पस्तावतील."
 काँग्रेसच्या अधिकृत इतिहासावरून असे स्पष्ट दिसते की लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजे ९ ऑगस्ट १९४२ पासून देशात आंदोलन सुरू व्हावे अशी कोणतीच तयारी नव्हती, कल्पनाही नव्हती आणि खरे खटले म्हटले तर, इच्छाही नव्हती. गोवालिया टँक ठरावाचे हत्यार घेऊन गांधीजींनी व्हाईसरॉयशी संपर्क साधावा आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने काही पदरात पाडून घ्यावे आणि मग जपान (सुभाषचंद्रांसहित) विरुद्ध भारतीय जनतेस उभे करण्याचा निर्णय काँग्रेसला उजळ माथ्याने घेता यावा अशी काहीशी आखणी होती.
 भीती जपानची का सुभाषचंद्रांची?

 पण काँग्रेस नेतृत्वाचा आंतराष्ट्रीय परिस्थितीचा अभ्यास अपुरा आणि बालीश होता. अमेरिका आणि इंग्लंड एकत्र असताना आणि युरोपमधील सर्व पादाक्रांत देशांत भूमिगत विरोध चालू असताना दुसऱ्या महायुद्धात अंतिम विजय दोस्त राष्ट्रांचा होणार याबद्दल इंग्रजांच्या मनात कधीच शंका नव्हती. लंडनवर बाँबगोळ्यांचा संततधार वर्षाव होत असतानाही त्यांचा विश्वास ढळला नव्हता. जर्मनीवरचा प्रतिहल्ला सुरू करण्याआधी हिटलरच्या हातून समाजवादी रशिया नेस्तनाबूत करता आला तर ते इंग्लंड-अमेरिकेस हवे होते. प्रतिहल्ला सुरू करण्यात या कारणाने त्यांनी चालढकल चालवली होती. रशियाने अपेक्षा नसताना चिवटपणे झुंज दिली आणि नाझी फौजांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. जर्मनीच्या पराभवाचे श्रेय सगळे रशियाला मिळेल अशी लक्षणे दिसू लागताच नॉर्मंडी फौजा उतरवण्याची तारीख ठरली, एवढेच. अंतिम विजयाची

भारतासाठी । ९८