पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेतृत्वाला मोठी चिंता लागली होती. जपानी फौजांच्या अग्रभागी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद फौज असेल आणि त्यामुळे परिस्थिती अजूनच नाजूक आणि कठीण होईल अशी त्यांची भीती. सुभाषचंद्रांविरुद्ध लढाईला उभे ठाकण्याची भाषा पंडित नेहरूंनी केलेली होती.
 'क्रिप्स मिशन' हिंदुस्थानात आले. युद्ध संपताच हिंदुस्थानच्या राजकीय महत्त्वाकांक्षांचा आदर राखला जाईल असे आश्वासन साम्राज्यातर्फे देण्यात आले. गांधीजींनी या आश्वासनाचा 'बुडत्या बँकेवरील चेक' म्हणूनच उपहास केला. ब्रिटिश साम्राज्याची बँक बुडणार. इंग्रज काढता पाय घेणार आणि मग जपान्यांविरुद्ध लढा चालवायला देशात कोणी उरणारच नाही आणि आझाद हिंद फौजेचा वापर करून जपानी सगळ्या देशावर आपली सत्ता बसवतील किंवा सुभाषचंद्र बोसांच्या हाती हिंदुस्थानची सत्ता जाईल अशा चिंतेने ग्रस्त झालेल्या काँग्रेसने एक विशेष रणनीती आखली.
 भयभीतांची रणनीती
 १४ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक भरली आणि हिंदुस्थानी लोकांच्या आकांक्षा आणि दोस्त राष्ट्रांचे युद्धाचे हेतू या दोघांच्याही पूर्तीसाठी इंग्रजांनी देश सोडून जावे आणि स्वतंत्र भारताची एक दोस्त राष्ट्र म्हणून जपान (सुभाषचंद्रांसहित) विरुद्ध मदत घ्यावी असा प्रस्ताव होता. इंग्रजांनी माघार घेतली नाही तर? काँग्रेस "नाईलाजाने १९२० सालापासून तयार केलेली सर्व अहिंसात्मक ताकद राजकीय हक्कांसाठी आणि स्वतंत्र्य मिळवण्यासाठी वापरेल. हे व्यापक आंदोलन गांधींच्या नेतृत्वाखाली असेल."
 कार्यकारिणीचा हा ठराव मुंबईतील गोवालिया टॅंकवर भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनासमोर आला. भारतातील इंग्रजी साम्राज्य समाप्त होणे हे भारताच्या, एवढेच नव्हे तर दोस्त राष्ट्रांच्या हिताच्या दृष्टीने तातडीचे आहे असे काँग्रेस समितीने जाहीर केले. समितीने लोकांना सर्व प्रकारच्या धोक्यांसाठी आणि कष्टांसाठी धैर्याने आणि सहनशीलतेने गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्र होऊन तयार राहण्याचा आदेश दिला.

 अहिंसा हा चळवळीचा पाया असेल हे ठरावात स्पष्ट करण्यात आले. जर लोकांना आदेश देणे शक्य राहिले नाही आणि काँग्रेस समितीचे कामकाजच ठप्प झाले तर प्रत्येक स्त्री-पुरुषाने आंदोलनाच्या सुनिश्चित चौकटीत (म्हणजे अहिंसात्मक) आपणास जे योग्य वाटेल ते करावे. स्वातंत्र्य येऊन हिंदुस्थानची मुक्तता होईपर्यंत आता थांबणे नाही, असेही ठरावात म्हटले.

भारतासाठी । ९७