पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चिमूरकांडाच्या ५० व्या वर्षदिनी आवर्जून हजर राहिले होते. बेचाळीसच्या क्रांतिकारकांना अधिकृत मान्यता ५० वर्षांच्या अवधीनंतर का होईना, मिळाली. त्यांना हुतात्मे म्हणून मान्यता होती, स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन होती; पण त्यांच्या क्रांती कार्यक्रमाला पहिल्यांदा मान्यता मिळाली.
 ४२ साली घडले काय?
 गोवालिया टॅंकच्या घोषणेनंतर पहिल्याच दिवशी जवळजवळ सगळ्याच पुढाऱ्यांना अटक झाली. सरकार असे काही करेल ही कोणाचीच अपेक्षा नव्हती. गांधीजी व्हाइसरायशी बोलणी करतील आणि चर्चा फिस्कटली तर नेमके काय करायचे ते सांगतील. मग त्यांच्या आदेशाप्रमाणे काय करायचे ते करू अशा विचारात सर्व स्वातंत्र्यसैनिक होते. महात्माजींना अटक झाली म्हणजे आता वाटाघाटी होत नाहीत. म्हणजे आंदोलन पुढे येऊनच ठाकले; पण आंदोलन म्हणजे काय करायचे हे कुणालाच माहिती नव्हते. मग लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आले; घोषणा देऊ लागले. तुरुंगात जाऊ लागले, लाठ्या खाऊ लागले, बंदुकांनाही सामोरे जाऊ लागले; पण १९४२ च्या आंदोलनाचा एक दुसरा महत्त्वाचा भाग होता. उघड उघड हिंसाचाराचा, घातपाताचा; युद्धकार्यास ज्या ज्या प्रकारे अडथळा करता येईल आणि सरकार चालणे ज्या ज्या तऱ्हेने अशक्य होईल ते सर्व मार्ग वापरले गेले. टपाल कचेऱ्या जाळणे, विजेच्या व संदेश वाहतुकीच्या तारा तोडणे, रेल्वेचे रूळ उखडणे, जागोजाग सरकारच्या साऱ्या नाड्याच आखडल्या जातील असे संप, हरताळ घडवून आणणे असे कार्यक्रम जागोजागी तरुणांनी राबवले.
 इ. स. १९४२ च्या चळवळीतील काँग्रेसची जबाबदारी या विषयावर लंडन येथे एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. श्वेतपत्रिकेत म्हटले होते; ९ ऑगस्ट रोजी नेत्यांची धरपकड झाली; पण अटक झालेल्या नेत्यांची संख्या शेकड्यात मोजण्याएवढीच होती. नंतर घडलेला उद्रेक नेत्यांच्या, विशेषतः महात्मा गांधींच्या अटकेने संतापलेल्या लोकांनी स्वयंस्फूर्त केला. या युक्तिवादात काही तथ्य नाही.

 दंगली जवळजवळ एकाच वेळी मद्रास, मुंबई, बिहार, मध्य आणि संयुक्त प्रांत अशा दूरदूरच्या प्रदेशात सुरू झाल्या. दंगलीत झालेले नुकसान इतके मोठे होते की असे नुकसान ऐनवेळी काही विशेष औजारे, हत्यारे न वापरता, पूर्वतयारीशिवाय घडले असेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. घातपाताचे अनेक प्रकार अशा तऱ्हेने घडवण्यात आले की त्यामागे तंत्रकुशल हात असावेत

भारतासाठी । ९५