पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे; पण ही असली मोजमापाची पद्धत मनुष्यप्राण्याला लागू करणे अगदीच हास्यास्पद आहे. माणसाचे शरीर हा एक मोठा चमत्कार आहे. वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जाऊन आपल्या दैनंदिन जीवनातील नित्यनियमाच्या गरजा भागवण्याचे त्यांचे सामर्थ्य विलक्षण आहे. शरीराच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पंचपक्वान्नांचा आहार काय आणि झुणकाभाकरीचा आहार काय, फारसा फरक पडत नाही; पण काही अनपेक्षित घडले तर मेवामिठाई खाणारा तगून जाताना दिसतो ते त्याच्या श्रेष्ठ खाद्यामुळे नव्हे, तर खाद्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर कवचकुंडलांमुळे. गरिबीचे मोजमाप उष्मांकांत करून चालणार नाही. अनपेक्षित, अगदी असंभाव्य अपघातांना सामोरे जाण्याचे माणसाचे सामर्थ्य किती या फूटपट्टीने गरीबी, श्रीमंती मोजणे योग्य होईल.
 एका श्रीमंतीच्या टोकाला, प्रत्यक्ष अणुबाँब पडला तरी निर्धास्तपणे जगून राहतील असे बर्नचे लोक, तर दुसऱ्या टोकाला किरकोळ भूकंपाच्या धक्क्यामुळे आपल्याच घराच्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाणारे किल्लारी-सास्तूरचे शेतकरी आणि त्यांचे देशभरच्या गावागावात पसरलेले भाईबंद. भाईबंद शेतकऱ्यांचा भूकंप अजून यायचा आहे म्हणून ते सारे जिवंत आहेत. ते जिवंत असल्याचे श्रेय कोणी घेऊ शकत नाही, त्यांच्या अपमृत्यूचे पाप मात्र व्यवस्थेचे म्हणजे राजाचे आहे.

(२१ ऑक्टोबर १९९३)

♦♦

भारतासाठी । ९३