पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तासाभरात हेलिकॉप्टरे अपघातस्थळी जाऊन पोहोचली. अडकलेल्या निर्यारोहकांच्या सुटकेचा सारा प्रचंड खटाटोप घरोघर लोकांनी टेलिव्हिजनवर प्रत्यक्ष पाहिला.
 लष्करी सुरुंग पेरण्याच्या प्रदेशात एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू चुकून शिरले तर त्याच्या सुटकेच्या प्रयत्नांवर सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले. माझ्या दशकभरच्या निवासात स्वित्झर्लंडवर कोसळलेली संकटे ही एवढीच. श्रीमंत देशात संकटांचा महाभयंकर दुष्काळ!
 निसर्ग त्या देशांवर बहाल आहे म्हणावे तर तेही खरे नाही. स्वित्झर्लंडमध्ये बहुतेक भागात दरवर्षी निम्मा वेळतरी बर्फ पडतच असतो. त्याच्या तुलनेने हिमपात पुष्कळ कमी असला तरी उत्तरकाशी प्रदेशात बद्रीनाथची देवळे बंद होऊन पुजाऱ्यासकट सगळे जोशीमठपर्यंत परत येतात; पण स्वित्झर्लंडसारखे देश असल्या वर्षावांना न जुमानता काम करीत राहतात. एवढेच नव्हे तर बर्फ पडू लागल्यानंतर डोंगर डोंगर बर्फाच्छादित घसरणीवरून वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या जत्रांनी भरून जातात.
 न येणाऱ्या संकटांचा सामना

 योगायोगाने बर्न शहरातील एका नागरी सुरक्षेच्या केंद्रास भेट देण्याची संधी मिळाली. बर्नची लोकसंख्या त्यावेळी लाखाच्या आसपास होती. आजही तेवढीच असेल. स्वित्झर्लंड हा संपूर्ण शांततेचा आणि तटस्थतेचा देश. दोन्ही महायुद्धांतसुद्धा ही तटस्थता अबाधित राहिली. या तटस्थ, शांतताप्रिय देशातील प्रत्येक पुरुष लष्करातील सैनिक आहे हे मला ठाऊक होते. कधीकाळी कोणा शत्रूचे आक्रमण झालेच तर त्याला रोखण्यासाठी महामार्गांचे पट्टेच्या पट्टे बाजूला काढण्याची व्यवस्था आहे असे मी ऐकले होते. महामार्गाचा वापर लष्करी विमानांसाठी धावपट्टीसारखा करण्याची योजना आहे; अशी कुजबूज होती. शांतिदूत स्वित्झर्लंडच्या लष्करी तयारीच्या सगळ्या कथा ऐकूनदेखील डोळ्यांनी जे प्रत्यक्ष पाहिले त्यावर विश्वास बसेना. बर्नच्या एक लाख लोकवस्तीसाठी ३०,००० लोकांना पुरेल असा सुरक्षा निवारा जमिनीखाली १०० मीटर इतक्या खोलीवर एका प्रचंड बोगद्यात केला होता. एखादा अणुबाँब या बोगद्याच्या डोक्यावरच पडला तर गोष्ट वेगळी; अन्यथा आश्रयस्थान अगदी पक्के सुरक्षित. सगळ्या जागेत, जमिनीच्या इतक्या खोलीवरही हवा खेळती राहण्याची व्यवस्था. ३०,००० लोकांकरिता झोपण्याची व्यवस्था थ्री टियर शयनयानातल्यासारखी केलेली, त्यातील हजारएक बिछाने स्वच्छ पलंगपोस, ब्लँकेट घालून सदा तयार ठेवलेले. कोणत्याही संकटकाळी एक सेकंदाचासुद्धा विलंब न लागता ही यंत्रणा मदत

भारतासाठी । ९०