पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





किल्लारीचे पाप राजाचे


 समानी सुलतानी
 स्वित्झर्लंडमध्ये राहत असताना एका गोष्टीची सतत टोचणी असे. १९७० सालचे पूर्व बंगालमधील महापूरग्रस्त, मग १९७१ मधील बांगलादेशचे निर्वासित, त्यानंतर हिंदुस्थानातील १९७२ चे दुष्काळग्रस्त. एक ना एक नैसर्गिक आपत्ती, तिचे लक्षावधी बळी आणि त्यांची हीनदीन अवस्था यांच्या बातम्या वर्तमानपत्रांत. रेडिओवर, टेलिव्हिजनवर सतत येत. अस्मानी संकटाच्या बातम्या नसल्या तर याह्याखान, इदी अमीन इत्यादी सुलतानांच्या क्रूर कहाण्या! अगदी स्वित्झर्लंडसारख्या देशात, संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयातही, कोणीही कितीही समानतेचे नाटक केले तरी आम्हा गरीब देशातल्या अधिकाऱ्यांकडे बाकीचे सगळे काहीशा दयेच्या आणि करुणेच्या भावनेने पाहत.
 कोणी आपल्यावर करुणा दाखवावी ही मोठी दाहक संवेदना आहे. अशावेळी मनात काही काळ का होईना विचार येऊन जाई, या श्रीमंत देशावर महापूर, भूकंप, ज्यालामुखी असे एक तरी संकट कोसळावे, हजारो माणसे निराधार व्हावीत म्हणजे त्यांना करुणा दाखवण्याची एखादी तरी संधी आपल्याला मिळेल; पण असे कधीच झाले नाही.
 संकटांची गरिबी
 एकदा स्वित्झर्लंडमध्ये भर उन्हाळ्यात तीन आठवडे पाऊस पडला नाही. सगळ्या माध्यमांतून धोक्याच्या सूचना खणखणू लागल्या, "जंगलाजंगलातील गवत सुकेसुके, कोरडे झाले आहे; आगीचा धोका आहे. सिगारेटचे थोटूक प्रवासात इकडे-तिकडे टाकू नका."

 आणखी एकदा आल्पसमधील एक शिखर सर करण्यासाठी आठ लोकांची टोळी गेली होती. बर्फाच्या वर्षावामुळे ती अडकून पडली. त्यांना सोडविण्याकरिता

भारतासाठी । ८९