पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नपुंसकतेचे, प्रतिकारहीनतेचे समर्थन करीत स्वस्थ बसून राहतात. कॅन्सरसारखा रोग आणि प्रतिकारशक्ती संपलेली!
 काही निरोगी पेशी अजून शिल्लक
 देश अजून थोडीफार हालचाल करतो आहे. धुगधुगी दाखवतो आहे. कारण कॅन्सरच्या गाठींसकट सगळ्या देशाला पोसण्याचे काम अजून काही पेशी करत आहेत. सगळ्या सरकारी कारभाराचा जाच सोसूनही शेतकरी शेते पिकवीत आहेत. कोठे सरकारशी, इन्स्पेक्टरांशी लढता? आपल्याला जमेल तसे व्यापारउदीम चालवावा अशा विचाराने व्यापारी, स्वयंरोजगारी काम करत आहेत म्हणून देश चालत आहे.
 रोग बळावतो आहे. कॅन्सरच्या गाठी सगळ्या नाड्यांना आवळून अधिक कठोरपणे सर्व जीवनरस शोषून घेण्याच्या प्रयत्नाला लागल्या आहेत. कॅन्सरचा प्रभाव जितका वाढेल तितकी त्याची प्रतिकार करण्याची शक्ती एडस् च्या प्रभावाने कमी होते आहे.
 वैदूंचा विषोपचार
 रोगी इस्पितळात आहे; पण आशा फार नाही. जुनीपानी माणसे पंचाक्षऱ्याकडून अंगारे धुपारे करवत आहेत. गंडे, दोरे बांधणाऱ्या वैदूंचीही गर्दी उसळली आहे. राहिल्यासाहिल्या निरोगी पेशीत एकमेकांत लढाई लावून देण्याची त्यांची उपाययोजना आहे. त्यासाठी जातिद्वेषाचे, धर्मद्वेषाचे विष ते शरीरात सोडत आहेत.
 हजारो वर्षांच्या दुरवस्थेने खंगलेला देश, त्यात कॅन्सरसारखा असाध्य रोग, त्यात एडस् मुळे प्रतिकारशक्ती संपलेली आणि औषध म्हणून विषाची इंजेक्शने! अतिदक्षता विभाग, रोग्याचे नाव भारत; त्याच्या परिस्थितीसंबंधीची ही कागदपत्रे!


(६ ऑक्टोबर १९९३)

♦♦

भारतासाठी। ८८