पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी शेतकरी संघटनेने राखीव जागाविरोधी किंवा राखीव जागांच्या बाजूने कोणतंही आंदोलन खेडेगावात पोहोचू देऊ नये, गावात त्याला प्रवेश मिळू नये असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता आणि त्यानंतर ते आंदोलन बारगळलं. त्यानंतर केंद्र शासनाने सर्व राज्य शासनांना सल्ला दिला, की मंडल आयोगासंबंधीचा निर्णय हा केंद्र शासनाने घ्यायचा आहे; कोणत्याही राज्याने राज्यपातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू नये.

 राष्ट्रीय मोर्चाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 'मंडल आयोगाच्या शिफारशी' अंमलात आणण्यात येतील असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाप्रमाणे पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये ही घोषणा केली. त्यासंबंधी आधी काही चर्चा व्हायला हवी होती, वेगवेगळ्या पक्षांशी विचारविनिमय व्हायला पाहिजे होता असं अनेक मंडळी आज म्हणताहेत; पण प्रत्यक्षात जर इतिहास पाहिला तर दहा वर्षांपूर्वी मंडल आयोगाचा अहवाल शासनापुढे आला किंवा खरा इतिहास पाहायचा झाला तर त्याच्याही आधी जाऊन, काका कालेलकर समितीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल.

 १९५३ मध्ये प्रख्यात गांधीवादी विचारवंत काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीचा उद्देश असा, की देशातल्या यच्चयावत् नागरिकांना नोकरी किंवा इतर सर्व बाबतींमध्ये समान संधी मिळाली पाहिजे अशी घटनेतील तरतूद आहे; पण देशामध्ये अनेक मागासलेले वर्ग, जाती-जमाती आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बरोबरीने येता यावं याकरिता काही विशेष तरतुदी आणि योजना करण्याचाही अधिकार शासनाला देण्यात आला; पण नेमके मागासलेले वर्ग कोणते, मागासलेले वर्ग (Classes) म्हणजे मागासलेल्या जाती-जमातीच काय? Class आणि Caste या दोन्हींमध्ये फरक आहे; पण घटनेमध्ये वापरण्यात आलेला शब्द वर्ग असा आहे आणि त्याच्याबरोबर मागासलेले सेक्टर (Sector) किंवा सेक्शन (Section) असाही शब्द वापरण्यात आला आहे. तेव्हा याचा नेमका अर्थ काय? मागासलेल्या वर्गांना देशाच्या मुख्य प्रवाहाबरोबरीने कोणाला आणायचं हे ठरविण्याकरिता काका कालेलकर समिती नेमण्यात आली. त्या समितीच्या अहवालामध्ये, अर्थातच मागासवर्गीय जाती-जमातींना राखीव जागा ठेवण्याची तरतूद करण्यात आली; पण विशेष गोष्ट अशी की हा अहवाल तयार होताना समितीच्या अध्यक्षांच्याच मनात या सर्व प्रश्नाविषयी काही शंका तयार होऊ

भारतासाठी।८