पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 न्यायमूर्ती, साहित्यिक, कलाकार, विद्वान यांनायुद्धा सरकारी मगरमिठीतून सोडवून मोकळे केले पाहिजे. त्यांनी आपापल्या स्वायत्त संस्था उभारल्या पाहिजेत. पदवी परीक्षेत कॉपी करताना पकडले गेलेले पोरगे मंत्री झाले म्हणून त्यांच्यापुढे महामहोपाध्याय कंबरेत वाकन नतस्तक होत आहेत अशी व्यवस्था संपली पाहिजे.

 गरिबांचे कल्याण करण्याचा सरकारचा खटाटोप गेली ५० वर्षे चालला आहे. गरीब गरीबच राहिले, पुढारी मात्र गब्बर झाले. गरिबांच्या कल्याणाच्या नावाखाली अर्थव्यवस्थेचा ताबा ठेवण्याचा डाव संपला पाहिजे. गरिबांचे काही भले करणारी एक झाली, तिचे नांव अहिल्याबाई होळकर, दीनदुबळ्या अपंगांचे पालन, संगोपन करणे, दुखणाईतांवर औषधोपचार करणे हे काम पुढाऱ्यांचे नाही, हे काम करुणेने करायचे आहे. खऱ्याखुऱ्या धर्मभावनेने प्रेरलेल्या लोकांचे हे काम आहे. ते धर्मसंस्थांकडेच राहिले पाहिजे.

 भारताचे पहिले गणराज्य कोसळले आहे. दुसरे गणराज्य उभे करणे आवश्यक आहे. त्याकरिता सध्याची घटना आणि राज्यपद्धती टाकून द्यावी लागेल. सर्वंकष सत्ता केंद्रित करण्याची कल्पना सोडून मानवी जीवनातील वेगवेगळ्या पैलूंकरिता स्वतंत्र स्वायत्त संस्था आपोआप उभ्या राहू लागतील. सत्तेचा जादूचा दिवा अशी गोष्टच राहणार नाही आणि त्या जादूच्या दिव्याच्या प्राप्तीकरिता चाललेले राक्षस, हडळ, खवीस आणि ब्रह्मसमंध यांचे अमानुष खेळ बंद पडतील.

(२१ जानेवारी १९९३)

♦♦

भारतासाठी । ७३