पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सत्ता हाती टिकवण्यासाठी काय वाटेल ते वेडाचार आणि क्ररकृत्ये काँग्रेसवाल्यांनी का केली? सत्ता टिकवण्यासाठी चक्क घराणेशाहीला उत्तेजन काँग्रेसवाल्यांनी का दिले? आणि नेहरू घराणेशाहीला उत्तर म्हणून रघुवंशाचा उपयोग करण्याचा अभद्र आणि देशघातक मोह स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला का झाला?

 या प्रश्नांचे उत्तर सरळ आहे. नेहरूव्यवस्थेचा शेवटी परिणाम काय झाला? जो जो म्हणून कष्ट करतो, उत्पादन करतो, त्याला आयुष्यात वर चढण्याची आशा नाही; पण ज्याच्या हाती सत्तेचा जादूचा दिवा लागतो त्याच्यापुढे सर्व सुखसाधने हात जोडून उभी राहतात. ही नेहरू व्यवस्थेची निष्पत्ती आहे. सत्ता असली तर पैसा आहे. भोवती सलाम घालणारे लोक आहेत. सत्तेच्या मंत्राने सर्व दरवाजे उघडतात. जमिनी बळकावता येतात, बांधकामे करता येतात. साधे रेल्वेचे तिकीटसुद्धा सत्तेशिवाय मिळत नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे.

 जोपर्यंत सत्ता इतकी मादक आणि मोहक आहे तोपर्यंत तिला लालचावलेले मतिभ्रष्ट काय पाहिजे तो आणि नको तो पागलपणा करणार आहेत. त्यांनी केलेल्या पागलपणाचा एक एक विषय सोडवू म्हटल्याने सुटणार नाही. एक निरगाठ सुटली तर दुसरी महागाठ पुढे येईल. कारण सत्ता मिळवण्यासाठी जातीचे, भाषेचे, धर्माचे, प्रदेशांचे राक्षस उभे करणे हा किफायतशीर धंदा होतो.

 याला उपाय एकच आहे. सत्ता ही अनाकर्षक बनली पाहिजे. सत्ता हाती आली सगळे काही मिळते आणि इतिहासात नावही होते ही कल्पना संपली ही अयोध्येसारखे प्रश्न उभे करणे थांबेल.

 नेहरूंनी सर्वभक्ष्यी सरकार उभे केले. या खादाड महाराक्षसाच्या पोटातून त्याच्या बळींची सुटका केली पाहिजे.

 सरकार कशाला लागते? सज्जन,ससंस्कृत समाजातही थोडेफार दष्ट प्रवृत्तीचे लोक असतात आणि शेजारच्या शत्रूची देशावर वाईट नजर असतेच; तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था तसेच शत्रूपासून संरक्षण अशा संकटकालीन कामाकरिता सरकारची गरज आहेच. सरकार अजिबात संपणार नाही; पण सरकारची जागा शौचकूपासारखी आहे. त्या कामांना दिवाणखान्यात जागा असता कामा नये.

 अर्थव्यवस्था तर सरकारी राक्षसाच्या जबड्यातून सोडवलीच पाहिजे. अर्थव्यवस्था खुली झाली; कष्टकरी, उत्पादक हे जर माणूस म्हणून सन्मानाने जगू शकले तर पुढाऱ्यांना कोण धूप घालणार आहे?

भारतासाठी । ७२