पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'देशी' शब्दात स्वदेशीचे वलय नाही, अभिमान नाही. उलट, देशी म्हणजे गचाळ, कमी प्रतीचा, बेभरवशाचा माल अशी जुगुत्सा.
 बलुतेदारी आणि गावातली कारागिरी आता संपुष्टात आली आहे. जे काय बनते ते छोट्या कारखान्यात नाहीतर मोठ्या कारखान्यात. सर्व कारखान्यांतील यंत्रांची रचना विलायती प्रतिभेतून निघालेली. तंत्रज्ञान विलायती, मग यंत्रांची बांधणी भली देशी भूपृष्ठावर झालेली असो. नित्यनियमाच्या वापरातील अनेक वस्तू तयार करण्याकरिता लागणारा कच्चा मालही विलायती, तयार करणारी माणसे विलायती वेश-भाषा-संस्कृतीच्या जवळात जवळ जाण्याची धडपड करणारी. शक्य असते तर एखादे मलम लावून त्यांनी स्वतःला शुभ्रकायदेखील बनवून घेतले असते! काळ्या इंग्रजाची कारखानदारी म्हणजे आता स्वदेशी ठरली.
 इंग्लंडची 'स्वदेशी'

 आजच्या परिस्थितीत विदेशी-स्वदेशी असा फरक करणे शक्यही नाही आणि म्हटले तर, आवश्यकताही नाही. इंग्रजाला काटशह म्हणून स्वदेशी आंदोलन उभे राहिले. हे हिंदुस्थानातच घडले असे नाही तर जगभर अनेक देशांत हेच घडले आहे. इंग्लंड देश औद्योगिक क्रांतीच्या आधी 'स्वदेशी'चा मोठा पुरस्कर्ता होता. जर्मनीसारख्या पुढारलेल्या देशांनी इंग्लंडच्या बाजारपेठा व्यापून टाकल्या तर इंग्रज व्यापारी आणि कामगार यांच्यावर कठीण अवस्था गुदरेल म्हणून परदेशी माल येऊ देऊच नये अशी मागणी इंग्लंडमधील, मुख्यतः व्यापाऱ्यांनी केली. इंग्लंडमधील स्वदेशी चळवळीचे नावच मुळी 'व्यापारीवाद' (Mercantilism) असे होते. हळूहळू परिस्थिती बदलली. जेम्स वॅटने वाफेचे इंजिन काढले आणि इंग्लंड झपाट्याने जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांना मागे टाकून दळणवळण आणि उद्योगक्षेत्रात पुढे सरसावला. आता परिस्थिती बदलली. परदेशी माल इंग्लंडच्या बाजारपेठेत उतरेल आणि देशी मालाला हटवेल ही शक्यता आणि भीती उरलीच नाही. उलट, इंग्लिश कारखान्यांत तयार होणारा माल इतर देशांत कसा पाठविता येईल याची चिंता व्यापाऱ्यांना पडली. जो तो देश व्यापारवादी बनला होता; आपल्याला देशाचे दरवाजे बंद करून परदेशी माल रोखून ठेवू पाहत होता. अनेक तटबंद्यांनी तुकडे तुकडे झालेल्या या जगात औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेल्या मालाचे ओघ अनिर्बंधपणे वाहायचे कसे? व्यापारवाद फेकून देऊन खुल्या बाजारपेठेचे तत्त्वज्ञान या काळात इंग्लंडमध्ये अॅडम स्मिथने मांडले आणि एका नव्या युगाला सुरुवात झाली.

भारतासाठी । ६४