पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मायदेशी नेणे आणि तयार वस्तूंसाठी भारतासारखी प्रचंड हुकमी बाजारपेठ मिळविणे ही त्याची रणनीती होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याच्या रणनीतीचा परिणाम स्पष्ट झाला. गोखले, रानड्यांनी त्याबद्दल लिहिले. जोतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या जिभेने सांगितले. गावातली हुन्नर, बलुतेदारी मोडकळीस आली आणि लक्ष्मीचा ओघ मँचेस्टरकडे जाऊ लागला. परसत्ता बनियाची तर त्यावर तोडगाही बनियाचाच पाहिजे! नव्या काळात घोड्यावर मांड ठोकून दांडपट्टा फिरवून नाना कसरती करून इंग्रजाला पळवू पाहाणारे कालबाह्य झाले. आणि 'स्वदेशी'चा उगम झाला. इंग्रज जुलूमजबरदस्ती तर करत नाही? त्याचा माल आपल्याला घ्यायला भाग तर पाडत नाही? मग दीनातल्या दीन प्रजेला निदान त्याचा विकत न घेण्याचे व्रत तर पाळता येईल? स्वदेशी चळवळीची थोडक्यात भूमिका अशी होती.
 स्वदेशी-विदेशी स्पष्ट भेद
 स्वदेशी आंदोलनाच्या अंमलबजावणीतही काही फारशा व्यावहारिक अडचणी आल्या नाहीत. स्वदेशी माल कोणता आणि विदेशी कोणता असा फरक करणे स्वदेशी चळवळीच्या काळात तरी फारसे कठीण नव्हते. जसजसा काळ गेला तसतसे ते अधिकाधिक कठीण होत गेले. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वदेशीविदेशीतील सरहद्द रेषा खूपच अस्पष्ट, धूसर होत गेली.
 पण स्वदेशी आंदोलनाच्या ऐन भरात ही अडचण फारशी जाणवत नव्हती. उभ्या देशात कारखाने तुरळक. जमसामान्यांच्या दैनंदिन जीवनातल्या बहुतेक गरजा कारखान्याच्या मालाला स्पर्श केल्याखेरीज पुर्ण होऊ शकत असत. गिरणी मुंबईला पण गिरणीतली यंत्रं परदेशात तयार झालेली. कापूस इथल्या काळ्या आईनं दिलेला पण वस्त्राची वीण विलायती. मग गिरणीचे कापड स्वदेशी का विदेशी असा सरहद्दीचा प्रश्न फारसा काही जाचक ठरला नाही. देशात साखरेचे कारखाने सुरू झाले तरी स्वदेशीवाले निष्ठेने गुळावरच भक्ती ठेवून राहिले. त्यानेही 'स्वेदशी'ला फारशी काही बाधा पोहोचली नाही.
 आता स्वदेशी काय उरले?

 १९९० दशकाच्या परिस्थितीत स्वदेशी विदेशी असा पंक्तिप्रपंच करणे अत्यंत जिकिरीचे होईल. किंबहुना, असा फरक करण्याचा प्रयत्न कोणी फारसा करीतही नाही. परदेशातून परत येताना बरोबर आणलेला किंवा येन केन प्रकारेण हस्तगत केलेला 'इम्पोर्टेड' माल एका बाजूला आणि बाकी सगळा 'देशी'. स्वदेशीविदेशी हा संदर्भ संपला आणि 'इंम्पोर्टेड'-देशी असा नवा संदर्भ सुरू झाला.

भारतासाठी।६३