पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पगार, गडगंज भत्ते, जबाबदारी शून्य, काम म्हणजे टेबलाखाली हात अशा छोट्यामोठ्या नोकरदार-नोकरशहांच्या तोंडचे पाणीच पळाले. देश बुडाला तरी चालेल, आमच्या नोकऱ्यांना धक्का लागता कामा नये, जुन्या महाराजांची संस्थाने गेली, पण आमची संस्थाने जाता कामा नयेत, अशा घोषणांचा गदारोळ त्यांनी चालू केला.
 ब) देशी कारखानदार
 जकात करांच्या तटबंदीमागे गचाळ माल महागड्या किंमतीत बनवून सर्वसामान्य ग्रहकांच्या जिवावर मजा लुटणारे कारखानदारही चिंतीत झाले. बाहेरून माल सहजपणे येऊ लागला, स्वस्त किंमतीत सुबक माल लोकांच्या हाती पडू लागला म्हणजे मग आपले काय? हे समजण्याइतके चातुर्य या वर्गाकडे हमखास होते. त्यांनी बोलणारी तोंडे मिळवायचा प्रयत्न चालू केला.
 आर्थिक बदलाला अपशकून
 काही अजागळ बावळे त्यांच्या हाती लागले. स्वदेशीच्या नावाखाली महात्माजींचा आणखी एकदा वध होतो आहे याची जाणीव नसणारेही भेटले पण, नेहरूवादाच्या या पिलावळीला खरा आधार भेटला तो हिंदुत्ववाद्यांचा. त्यांचे प्रवर्तित चक्र उलट्या टोकाला आले. ऐन स्वातंत्र्याच्या आंदोलनात विलायती मिरविणारे आता एका रात्रीत स्वदेशीभक्त बनले, भाषणे देऊ लागले, स्वदेशीच्या घोषणांनी भिंती रंगवू लागले. म्हणून मला सुरुवातीस सांगितलेल्या कोकणी म्हणीची आठवण झाली.
 'स्वदेशी'चे औचित्य
 काही काही शब्दांभोवती स्वत:चे असे वलय असते. त्याच्या, शब्दकोशातल्या मूळ अर्थाच्या पलीकडे अशा शब्दांची व्याप्ती असते. शब्द उच्चारल्यावर काही अलौकिक, अद्वितीय करून दाखविण्याची चेतना तरुणांच्या मनात आणि शरीरात सळसळावी अशी त्यांची शक्ती असते. 'स्वदेशी' हा अशा भारलेल्या आणि भारावणाऱ्या शब्दांपैकी एक.

 इंग्रज देशात आला त्याआधी सतत चालणाऱ्या लढायांनी आणि आक्रमणांनी गावगाडा मोडकळीस आला होता; पण, गावाची व्यवस्था अजून काही प्रमाणात तगून होती. जुन्या आक्रमकांप्रमाणे इंग्रज तलवारींनी आणि बंदुकांनी गावावर तुटून पडला नाही. बळजोरी केली नाही, जुलूम जबरस्ती केली नाही. तो साम्राज्य स्थापायला आलेला, पण चंगीजखानाच्या परंपरेतला नव्हे. त्याचे डावपेच व्यापारी. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती स्थिरावलेली होती. हिंदुस्थानातून कच्चा माल

भारतासाठी । ६२