पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असेल तर शेतकऱ्याला त्याचं पांढरं सोनं निदान निर्यात करून पोट भरता येईल एवढीतरी मुभा ठेवावी, एवढीच मागणी. राहुरीला परिषद भरली. प्रमुख पाहुणे चौधरी चरणसिंग. मंचावर उपस्थित, त्यावेळचे विरोधी पक्षाचे अग्रणी शरद पवार, प्रमोद महाजन इत्यादी इत्यादी. कोसळत्या पावसाला दाद न देता लोकांनी भाषणे ऐकली. सभेच्या शढवटी राजीवस्त्रांची होळी झाली. त्या ज्वालेच्या साक्षीने राजीवस्त्र न वापरण्याची जाहीर शपथ घेण्यात आली. सभेनंतर दोनच दिवसांनी सभेत तडाखेबाज भाषण केलेले प्रमोद महाजन नाशिकला बोलते झाले, 'आमचा स्वदेशी राजीवस्त्राला विरोध नाही, विदेशी राजीवस्त्राला आहे.' राजकारणी माणसं भूमिका बदलतात, इकडून उडून तिकडे जाऊन बसतात अशी माझी अपेक्षाच असते. राहुरीच्या याच सभेत भाषण करताना शरद पवारदेखील म्हणाले होते, 'आमच्या पंतप्रधानांना (राजीव गांधींना) तर घरापासून सगळीकडे विलायती गोष्टीच लागतात. समोरच्या बहुसंख्य अशिक्षित निरक्षर स्त्री-पुरुष शेतकरी समाजातसुद्धा या, सदभिरुचीशी फारकत घेणाऱ्या वाक्याबद्दल नापसंतीची आठी कपाळावर उठली होती. शरद पवार बोलले आणि वर्षाभरात मनोमिलन करून खाविंदचरणारविंदी मिलिंदायमान होण्यासाठी निघून गेले; पण, प्रमोद महाजनांची कोलांटी उडी काही अजबच. राहुरीला प्रतिज्ञा घेण्याची कुणी त्यांच्यावर बळजबरी केली नव्हती! त्यांनी स्वतःहून हात वर उठवून, मूठ आवळून प्रतिज्ञा घेतली. त्याची ध्वनिचित्रफीत उपलब्ध आहे. अठेचाळीस तासांत कोणा बोलवित्या धन्याने त्यांचा कान धरला की त्यांना एकदम स्वदेशीच्या प्रेमाचे भरते यावे? ते प्रमोदरावांना माहीत आहे, मलाही माहीत आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यालाही ठाऊक आहे.
 स्वातंत्र्यलढ्यातील ऐन मोक्याच्या वेळी विलायतीची ऐट मिरविणारे आता एकदम 'स्वदेशी प्रेमी झाले. मूर्खाच्या नाकाला दुसऱ्यांदा घाण लागली.
 बदलाच्या चाहुलीने व्याकुळलेले
 मूर्खाच्या नाकाला तिसऱ्यांदा घाण लागली ती या वर्षा-दोन वर्षांत. इतिहासाने संपवलेले नेहरू-अर्थशास्त्र बाजूला सारून बाजारपेठेला मानणारे नवीन अर्थशास्त्र पुढे येऊ लागले आहे. परकीय चलन वाचविण्याच्या मिषाने नेहरू-व्यवस्थेत उभ्या झालेल्या लायसेन्स-परमिट व्यवस्थेत बदल होतील अशी चिन्हे दिसू लागली. या बदलांमुळे अनेक जीव व्याकूळ झाले.
 अ) नोकरदार

 खुल्या बाजारपेठेच्या हवेने सरकारी आणि निम-सरकारी नोकऱ्यांत भरगच्च

भारतासाठी।६१