पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


काळ्या इंग्रजाची भगवी 'स्वदेशी'



 'मूर्खाच्या नाकाला तीनदा घाण' अशा अर्थाची वारंवार वापरली जाणारी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. आपल्याला समजत नसलेल्या विषयात नाक खुपसायला गेलेल्या एका अर्धवट बुद्धीच्या माणसाच्या मोठ्या मनोरंजक कथेवर ही म्हण आधारली आहे. कोकणात फिरताना अनेक वेळा अनेक गावी अनेक जणांनी ही कथा पुरेपूर कोकणी हावभाव आणि अभिनय यांच्यासकट मला ऐकविली आहे.

 या म्हणीची आठवण होण्याचं कारण घडलं ते असं. राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बैठकीकरिता मी सभागृहापाशी पोहोचलो तेव्हा एक तरुण पत्रकार माझी सभागृहापाशी वाट पाहात होते. त्यांनी आपला परिचय करून दिला. प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या महाशंखाचे नाव मिरविणाऱ्या एका साप्ताहिकातर्फे हे पत्रकार माझी भेट घेण्याकरिता आले होते. सभास्थानीच्या वातावरणात सगळीकडे अयोध्या, मंदिर आणि मशीद यांची हवा होती. या विषयावर मी बरीचशी वेगळी भूमिका सातत्याने मांडत आलो आहे आणि या साप्ताहिकाच्या काकरवित्यांचा मंदिरप्रकरणी जगजाहीर हात असल्यामुळे माझी मंदिरप्रश्नी मुलाखत घेण्याची त्यांची इच्छा असावी असे मी गृहित धरले. अयोध्या प्रश्नाविषयीच्या माझ्या लेखाची एक प्रत देऊन मोकळे व्हावे असा माझा विचार चालला होता, तेवढ्यात पत्रकार महाशयांनी स्पष्ट केले की, त्यांना माझी मुलाखत हवी होती; स्वस्थपणे, सविस्तरपणे मुलाखत हवी होती; पण ती अयोध्येच्या प्रश्नावर नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संबंधित संघटना यांनी चालू केलेल्या स्वदेशी आंदोलनाबद्दल माझ्याशी बोलावे अशी त्यांची इच्छा होती.

 गांधीजींच्या स्वेदेशीला अपशकून

 अगदी लहानपणची आठवण झाली.बेचाळीसची चळवळ ओसरत आलेली.

भारतासाठी । ५९