पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


शरणागती हे फारसे संभवत नाही. उभयपक्षी थोडातरी समजूतदारपणा, तडजोड, देवाणघेवाण करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. दुर्दैवाने, जगात नेतृत्वात हे सामर्थ्य असू शकत नाही. या नेत्यांची स्थिती वाघाच्या पाठीवर बसलेल्यासारखी झाली आहे. पाठीवर फार काळ बसून राहणे शक्य नाही आणि खाली उतरावे तर वाघच चट्टामट्टा करण्याची निश्चिती. जो कुणी हिंदू किंवा मुसलमान नेता काही तडजोड करण्याची तयारी दाखवेल त्याची लगेच हुर्रेवडी उडवली जाईल आणि देशद्रोही, धर्मद्रोही अशी त्याची संभावना होईल. एवढी हिंमत कोणत्याच जमातीच्या नेतृत्वात नाही.
 एक तिसरी जमात

 पण याहीपेक्षा, एका महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकतो. मशीद राहावी की मंदिर राहावे की दोघांच्या मधला काही 'मध्यम मार्ग' राहावा? या प्रश्नाचा निर्णय काय फक्त मंदिरवादी आणि मशीदवादी या दोघांच्याच स्वारस्याचा आहे? मला स्वतःला मंदिरातही स्वारस्य नाही आणि मशीदीतही नाही; पण माझा आग्रह आहे की पुराणकालीन किंवा इतिहासकालीन वास्तू आहेत तशा जतन कराव्यात, त्यात असे फेरफार करूच नयेत. इतिहासातील धामधुमीच्या काळात देऊळ उद्ध्वस्त करून त्या जागी मशीद बांधलेली असेल तर त्यावेळी झालेल्या राष्ट्रीय मानहानीची भरपाई आता या काळात मशीदीच्या जागी पुन्हा मंदिर बांधल्याने कशी काय होईल? इतिहासात घडलेल्या मानभंगाचा जुनाट पद्धतीने बदला घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'डॉन क्विक्झोटगरी' आहे. जुन्या काळातल्याप्रमाणे शिलेदाराचा पोशाख करून, घोड्यावर स्वार होऊन, हाती तलवार, बर्ची घेऊन आज कोणी निघेल तर त्याची रवानगी येरवड्याच्या इस्पितळातच होईल. इतिहासातील मानभंगाची भरपाई कशी करावी याचे उदाहरण आपल्या डोळ्यांदेखत नुकतेच जर्मनीत घडले आहे. पश्चिम जर्मनीने कठोर परिश्रमाने आणि कल्पकतेने राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य इतके वाढवले की पूर्व जर्मनीतील जनसामान्यास पश्चिम जर्मनीचा नागरिक होण्याचे भाग्य मिळावे अशी तहान लागली. इतिहासाचा विचार करत राहिलो तर वर्तमानही हातातून निसटून जाईल. भारताने जर पश्चिम जर्मनीसारखा आर्थिक चमत्कार घडवून दाखवला तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिलोन, ब्रह्मदेश, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया, थायलंड यांसारखे भारतापासून दूर झालेले प्रदेश पुन्हा भारताजवळ येण्याची पराकाष्टा करू लागतील. इतिहासात पराभूत झालेले आम्ही, वर्तमानात जागतिक दारिद्र्य रेषेखालचे आम्ही निरर्थक राष्ट्रीय मानापमानाच्या

भारतासाठी । ५३